सावंतवाडीत शेवटच्या दिवसांपर्यंत तब्बल 48 जणांची माघार

बांदा ZP - शेर्ले पं. स. बिनविरोध
Edited by: विनायक गांवस
Published on: January 27, 2026 17:18 PM
views 221  views

सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ४८ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यात जिल्हा परिषदेसाठी बांदा व पंचायत समितीसाठी शेर्ले बिनविरोध ठरल्याने जि.प. ८ व पंचायत समितीच्या १८ जागांवर लढत होणार आहे. यातील आंबोली व मळेवाड जि.प. तर, आंबोली, कोलगाव, विलवडे, इन्सुली, मळेवाड, न्हावेलीत शिवसेना व‌ भाजपने एबी फॉर्म कायम ठेवल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.‌

यात जिल्हा परिषद ९ मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. याठिकाणी भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध ठरले. तर माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ अपक्षांनी माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया रविंद्र मडगावकर विरुद्ध अपक्ष शिवानी नाईक यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश तळवणेकर यांच्यासह ३ अपक्षांनी माघार घेतली. यामुळे भाजपचे महेश सारंग विरूद्ध भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा यांच्यात लढत होणार आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून गुणाजी गावडे व चंद्रकांत कुबल यांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे विक्रांत सावंत विरुद्ध उबाठा शिवसेनेचे दिनेश सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे. बहुचर्चित आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील घटक पक्ष भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने आलेत. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म कायम ठेवल्याने येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंच्या विरोधात भाजपच्या शोभा गावडेंनी दंड थोपटले आहेत. 

तळवडे मतदारसंघातून तब्बल ६ अपक्षांनी माघार घेतली. भाजपच्या बंडखोर प्रमोद गावडेंनी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकाणातून बाजूला होण्याचे संकेत देत लढतीतून माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे संदीप गावडे, उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह भाजपचे बंडखोर अपक्ष गंगाराम ऊर्फ अमेय पै यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इन्सुलीत उबाठा शिवसेनेच्या फिलीप रॉड्रिग्ज, माजी सभापती मानसी धुरी अशा तिघांनी माघार घेतली. यामुळे शिवसेनेचे झेवियर फर्नांडिस, अपक्ष नितिन राऊळ व भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा बंडखोर अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून एका अपक्षान माघार घेतली असून प्रियांका नारोजी शिवसेना, भाजपच्या अपर्णा सातोसकर व अपक्ष सानिका शेवडे यांच्यात लढत होणार आहे. महायुतीत या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून अमेय आरोंदेकर यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.‌ यामुळे शिवसेनेचे सुदन कवठणकर यांच्यासह भाजपच्या बंडखोर माजी सभापती शर्वाणी गांवकर व अपक्ष सिद्धेश नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २२ जाणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर ९ पैकी लढत होणाऱ्या ८ जिल्हा परिषद मतदारसंघातून २० जण आपल नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, पंचायत समितीच्या १८ जागांपैकी शेर्ले पंचायत समिती बिनविरोध ठरली आहे. अपक्ष जगन्नाथ धुरींच्या माघारीमुळे भाजपचे महेश धुरी बिनविरोध ठरलेत. माडखोल पंचायत समितीतून एका अपक्षान माघार घेतली असून अनिता राऊळ भाजप, अवनी राऊळ अपक्ष व उबाठा शिवसेनेच्या सुजल रेमुळकर यांच्यात लढत होणार आहे. आंबोली पंचायत समितीसाठी २ अपक्षांसह उबाठा शिवसेनेच्या बबन गावडेंनी माघार घेतली.‌ यामुळे अपक्ष अच्युत गावडे व रूपेश गावडे तसेच शिवसेनेचे मायकल डिसोझा, भाजपचे शशिकांत गावडे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. कोलगाव पंचायत समितीतून २ अपक्षांनी माघार घेतली असून शिवसेनेच्या प्रणाली टिळवे व भाजपच्या संध्या हळदणकर यांच्यात थेट लढत होणार आहे. कलंबिस्तमधून तिघांनी अर्ज मागे घेतल्याने उबाठा शिवसेनेचे पंढरी राऊळ, शिवसेना रमाकांत राऊळ व अपक्ष प्रथमेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. विलवडेतून भाजपचे प्रशांत सुकी, शिवसेना दिनानाथ कशाळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संदीप सुकी मैदानात आहेत. तिरंगी लढत इथे होणार आहे. कारिवडेतून भाजपच्या प्राजक्ता केळुसकर यांच्या विरोधात तिनं अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी रिया परब अपक्ष उमेदवाराने माघार घेतली.

तळवडे पंचायत समिती मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव, उबाठा शिवसेनेच्या श्वेता जाधव यांच्यासह अपक्ष प्रज्ञा जाधव व काजल जाधव यांच्यात लढत होत आहे. यात बाजी मारणाऱ्या महिलेला थेट सभापती पदाची लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तालुक्याच लक्ष तळवडेतील निकालाकडे लागून राहिले आहे.‌ अपक्ष अर्चना जाधव यांनी येथून माघार घेतली आहे. माजगाव पंचायत समितीतून दोघांनी माघार घेतली असून उबाठा शिवसेनेचे मंगेश राठवड, भाजपचे रूपेश बिर्जे व अपक्ष जितेंद्र गांवकर, विष्णू उर्फ आबा सावंत यांच्यात चौरंगी लढत होत आहे. इन्सुलीतून उबाठा शिवसेनेच्या फिलीप रॉड्रिग्जसह शिवा गावडेंनी माघार घेतली.‌ यामुळे भाजपच्या विठ्ठल पालव व शिवसेनेच्या रामचंद्र चराटकर यांच्यासमोर दोन अपक्षांच आव्हान आहे. चौरंगी सामना इथे होणार आहे. मळगाव पंचायत समितीतून अपक्ष राजू परब यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भाजपच्या गौरव जाधव‌ व उबाठा शिवसेनेच्या पांडुरंग राऊळ यांच्यात थेट लढत होणार आहे. चराठेतून शिवसेनेच्या उत्कर्षा गांवकर यांच्यासमोर २ अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने तिरंगी लढत होत आहे. अपक्ष आशांकिता बोंद्रे यांनी माघार घेतली असून समिक्षा गांवकर व तन्वी परब या अपक्ष रिंगणात आहेत.


तसेच मळेवाड पंचायत समिती मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून भाजपच्या धनश्री हेमंत मराठे, शिवसेना तेजल मुळीक व उबाठा शिवसेनेच्या मनिषा गोवेकर-राऊळ यांच्यात सामना रंगणार आहे. आरोंदा मतदारसंघात भाजपच्या नेहा कांबळी, उबाठा शिवसेनेच्या सुवर्णा तिरोडकर व‌ अपक्ष स्नेहल नेमळेकर यांच्यात लढत होत आहे.‌ अपक्ष उमेदवार उमा बुडेंनी माघार घेतली. तर, बांदा येथे भाजपच्या रुपाली शिरसाट विरुद्ध अपक्ष ऋतिका नाईक अशी दुरंगी लढत होत आहे. न्हावेली पंचायत समितीतून उबाठ शिवसेनेसह तिनं अपक्षांनी माघार घेतली. यामुळे शिवसेनेचे शरद धाऊसकर, कॉग्रेसचे पीटर फर्नांडिस, भाजपचे अष्टविनायक धाऊसकर आणि अपक्ष रमेश निर्गुण यांच्यात थेट लढत होत आहे. सातार्डा पंचायत समितीतून शिवसेना शेखर मांजरेकर, उबाठा शिवसेना उदय पारिपत्ये व अपक्ष प्रवीण परब यांच्यात लढाई होणार आहे.‌ याठिकाणी उल्हास परब अपक्ष यांनी माघार घेतली. तांबोळी मतदारसंघात शिवसेनेच्या प्रियांका नाईक यांच्यासमोर अपक्ष अर्चना पांगम व जान्हवी सावंत यांनी आव्हान कायम ठेवल्याने तिरंगी लढत होणार आहे. मिताली सावंत अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल २६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून १८ पैकी लढत होणाऱ्या १७ पंचायत समिती मतदारसंघात ५३ जण लढणार आहेत. तर आंबोली, कोलगाव, विलवडे, इन्सुली, मळेवाड, न्हावेलीत महायुती तुटली असून शिवसेना आणि भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत चिन्ह वाटप करण्यात आले असून त्यांच्याकडे ७ दिवसांत चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचण्याच आव्हान आहे.