
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, अमित सुकी, अरवारी, टिळवे, बालवाडी विभागाच्या वेंगुर्लेकर, लिपिक श्री. वैभव केंकरे तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस यांनी शाळेचे शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान वाखाण्याजोगे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी यापुढेही अधिक मेहनत घेऊन विविध स्पर्धांमध्ये भरघोस यश संपादन करावे व बक्षिसे प्राप्त करावीत, असे प्रेरणादायी मनोगत त्यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात शाळेला मिळालेल्या बेस्ट स्कूल अवार्ड बद्दल सर्व शिक्षक वृंदांचा गौरव करण्यात आला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शाळेचे शिक्षक श्री. डी. जी. वरक यांचा तसेच स्पर्धाप्रमुख श्रीमती राऊळ यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचा व मार्गदर्शक शिक्षकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना ज्ञानदीप संघटनेचे संस्थापक संचालक वाय. पी. नाईक यांच्या सहकार्यातून संघातील मुलांना मेडल प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती स्वरा राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती प्राची बिले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थीवर्गात समाधानाचे वातावरण दिसून आले.










