दोडामार्ग : मोरगाव येथे खनिज सदृश्य मातीचा तब्बल २३४.६७ ब्रास साठा आढळला अन् महसूल व जिल्हा खनिकर्म प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून खनिकर्म विभागाचे पथक बुधवारी तालुक्यात दाखल झाले. या अवैध साठ्यावर कोणती कार्यवाही झाली? हि माहिती समोर आली नसली तरी महसूल व खणी कर्म विभागाच्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांना धडकी भरली आहे.
दोडामार्ग तालुक्यात कळणे येथे खनिज प्रकल्प आहे. या खनिज प्रकल्पाचे वाहतुकीचे पास घेऊन त्याच्या आड इतरत्र ठिकाणची माती आणून मोरगाव येथे मातीचा साठा केला जात आहे. हे काम गतवर्षी जोरात सुरू होते. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने यंदाही आपले फावेल या इराद्याने खनिजतस्करांनी बिनदिक्कतपणे माती वाहतूक सुरू ठेवली. मात्र या वाहतुकीची तक्रार एका अज्ञाताने केली आणि खनिज तस्करांचे भिंग फुटले. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी गेलेल्या तलाठी श्री. लोले यांच्या समक्ष एक डंपर माती खाली करत होता.
तलाठ्यांनी त्यांचे काम पूर्ण करून सर्व अहवाल तहसील कार्यालयाला पाठवला. या अहवालाच्या आधारावर तहसीलदार अमोल पोवार यांनी माती साठवणूक केलेल्या जमीन मालकांना नोटीस काढली. यानंतर महसूल व जिल्हा खनिकर्म विभाग खडबडून जागा झाला. खनिकर्म विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने नेमकी काय कार्यवाही केली? हे मात्र समजू शकले नाही.
कळणे खाण प्रकल्पातील वाहतूक मागील १० ते १५ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे माती तस्करी करणाऱ्यांनी या खाणीच्या वाहतुकीच्या पासवर आणलेली माती नेमकी कुठली असावी? शिवाय लगतच्या सावंतवाडी तालुक्यातील मातीची येथे साठवणूक करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी या संपूर्ण तस्करीच्या मुळाशी जातील का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
मोरगाव येथील 'त्या' खनिज युक्त मातीसाठ्यावर कारवाई करण्यासाठी आपल्या विभागामार्फत काही कार्यवाही करण्यात आली का? असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना विचारले असता त्यांनी होकार दिला. कारवाई करण्यासंदर्भात खनिकर्म विभागाला सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.