
वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे बाबा रेडकर यांच्या घरामधील एका अडगळीच्या खोली मधे त्यांना सापाचे एक पिल्लू आढळून आले, लगेच बाजुला आणखी एक पिल्लू आढळून आले, त्यांनी तात्काळ तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना संपर्क करत सापांची माहिती दिली. महेश राऊळ यांनी तातडीने तिथे पोहचत ती पिल्ले रेस्क्यू करून आणखी आजूबाजूला बघितल्यावर त्यांना एक एक करत तब्बल ११ पिल्ले रेस्क्यू केलीत. त्यांनी त्या घरातील सर्वांना मार्गदर्शन करत धीर दिला आणि ती पिल्ले नानेटी या जातीची असून बिनविषारी असल्याचे सांगितले व आपण त्यांना न मारता संपर्क करुन जीवनदान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी ही बातमी वनविभागालाही कळविली.
महेश राऊळ हे पंचक्रोशीत सर्पमित्र आणि रक्तमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत ते रात्री-अपरात्री कोणाच्याही घरात साप आला आणि कॉल आल्यावर लगेच त्या ठिकाणी पोहचतात. त्यांनी आजवर केलेल्या सर्पबचाव जनजागृतीचा परिणाम स्वरुप, लोकं आता सापांना न मारता जीवनदान देण्यासाठी प्रवृत्त होत आहेत, ही बाब समाधानकारक आहे. महेश राऊळ यांनी त्या पिलांना सुरक्षीतपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. महेश राऊळ यांनी आजवर अनेक प्रकारचे साप तसेच अन्य प्राण्यांना जखमी असतील तर त्याच्यावर योग्य ते उपचार करून जीवनदान दिले आहे. महेश राऊळ यांच्या या कामाबद्दल जनतेतून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.