चित्रकार अक्षय मेस्त्री यांचा कलाविष्कार

'आम्ही साहित्यप्रेमी'तर्फे ओरोसला २६ जुलैला
Edited by:
Published on: July 22, 2025 18:12 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी : 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या जुलैच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्याशी गप्पागोष्टी आणि चित्रकलेच्या प्रात्यक्षिकाचा कलाविष्कार असा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा सहावा मासिक कार्यक्रम आहे. देवगड तालुक्यातील गवाणे या छोट्याशा गावात राहून चित्रकला क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केलेले युवा चित्रकार, पशुपक्षीप्रेमी, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता अक्षय मेस्त्री यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अक्षय मेस्त्री जलरंगातील निसर्गचित्रांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर शिवराई आणि एक रुपयाच्या नाण्यावर, पक्ष्याच्या पिसावर, तिळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, सुपारी, विटा, टोपी, चिपळी, घोंगडी यावर विठ्ठलाचे चित्र, साडीवर नवदुर्गा अशा अनेक करामती त्यांनी केल्या आहेत.

याचबरोबर संवेदनशील माणुस म्हणुन त्यांची वेगळी ओळख आहे. रस्त्यावर वाहनांच्या धडकेत जखमी झालेल्या शेकडो पशुपक्ष्यांवर त्यानी उपचार करुन त्यांना बरे करुन पुन्हा निसर्गात सोडले आहे. तसेच रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या हजारो पशुपक्ष्यांवर अंत्यसंस्कार केले आहेत. वृक्षारोपण हाही त्याचा आवडता छंद आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराशी गप्पा मारुन त्यांच्या चित्रकलेचे प्रात्यक्षिकही यावेळी करण्यात येणार आहे. अक्षय मेस्त्री यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

ओरोस येथे मार्च महिन्यात स्थापन झालेल्या 'आम्ही साहित्यप्रेमी' या व्यासपीठाने आतापर्यंत पाच मासिक कार्यक्रमांचे सलग आयोजन केले आहे. लेखक प्रवीण बांदेकर यांचे व्याख्यान व कवी दादा मडकईकर यांच्या कविता, 'मला आवडलेले पुस्तक', कथाकथन, मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत, 'आषाढसरी' कविसंमेलन अशा या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांना ओरोस परिसरातील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.