
देवगड : देवगड तालुक्यातील पडेल येथे परदेशी स्थलांतरित दुर्मिळ बदकांचे आगमन झाल्यामुळे पक्षी मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्गातील निसर्गवैविध्याचा आणखी एक दुर्मीळ असा परदेशी स्थलांतरित दुर्मिळ बदकांचा नमुना पडेल गावात दिसून आला आहे. ६ व ७ डिसेंबर२०२५ रोजी पडेल येथील पाणथळ भागामध्ये परदेशातून दीर्घ प्रवास करून आलेल्या दुर्मिळ स्थलांतरित जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली आहे.
निरीक्षणादरम्यान Ruddy Shelduck (ब्रह्मिनी बदक), Eurasian/Green-winged Teal, Northern Shoveler आणि Mallard (female) या प्रजातींचे दर्शन झाले. या प्रजाती हजारो किलोमीटरचा प्रवास चीन, रशिया, सायबेरिया, मध्य आशिया आणि युरोपमधून करीत भारतात हिवाळ्यासाठी येतात.
तज्ञांच्या मते, अशा स्थलांतरित प्रजातींची उपस्थिती हा परिसरातील पाणथळ जागा अद्यापही सुरक्षित व स्वच्छ असल्याचा सकारात्मक संकेत मानला जातो. मात्र वाढते अतिक्रमण, कचरा, आणि जलप्रदूषण यामुळे पुढील काळात असा अधिवास टिकवणे आव्हानात्मक ठरू शकते. निसर्गप्रेमींच्या मते,पाणथळ जागांचेसंरक्षण,लास्टिकमुक्ती,आणि नियमित पक्षीगणना (bird monitoring)या गोष्टींवर भर देणे अत्यावश्यक आहे.
पडेलमध्ये आढळलेल्या या दुर्मिळ जलपक्ष्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नैसर्गिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, हिवाळ्यातील पक्षी निरीक्षकांसाठी हा परिसर अधिक आकर्षणाचे ठिकाण ठरला आहे.पडेल परिसरातील शांत, कमी प्रदूषण असलेले दलदलीचे आणि ताजेपाण्याचे क्षेत्र या पक्ष्यांसाठी योग्य अधिवास ठरत असल्याचे तज्ञ सांगतात.
या पक्ष्यांचे दर्शन आणि छायाचित्रे निसर्ग व पक्षीप्रेमी कु. सारा संजय गांवकर यांनी टिपली असून त्यांनी स्थानिक निसर्गगटांपर्यंत ही माहिती पोहोचवली. त्यांच्या नोंदीमुळे पडेल परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.










