आंबा बागायतदारांना फवारणीसाठी मिळणारी औषधे दर्जाहीन..?

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 23, 2024 14:59 PM
views 534  views

मालवण : बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांना फवारणीसाठी मिळणारी औषधे दर्जाहीन स्वरूपात मिळत असल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. तुडतुडे, थ्रिप्स आदी किड व कीटक रोगाना दूर ठेवण्यासाठी लाखो रुपयांची औषधें खरेदी करूनही त्याची परिणामकारकता मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत कृषी विभागाने विक्रीस असलेल्या औषधांची तपासणी करावी, त्याबरोबरच शासनाने यात लक्ष घालून योग्यती कारवाई करून संकटात असलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा अशी मागणी मालवण तालुका आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

दरम्यान, शासनाने आंबा बागायतदारांची व्यथा समजून घेऊन या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार स्वरूपातील औषधें अनुदान स्वरुपात मिळण्याबाबत कृषी विभागामार्फत पावले उचलावीत अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. 

मालवण तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी यांनी मंगळवारी संयकाळी भरड दत्त मंदिर येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी आप्पा चव्हाण, सुधीर मांजरेकर, जगदीश गावकर, संदीप गावकर, सिजर डिसोजा, मधुकर लुडबे, राजन लुडबे, दीपक शिंदे, राहुल सावंत, सचिन कांबळी, जयवंत लुडबे, आदी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

गेल्या काही वर्षात सतत हवामान बदलाचा फटका आंबा व्यवसायाला बसत आहे. अवकाळी पाऊस, बदलता थंडीचा कालावधी, काही वेळा वाढणारा प्रचंड उष्मा या सर्वांमुळे आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यासोबतच विविध कीटक व किड रोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र या हवामान बदलामुळे दिसून येते. त्यामुळे वारंवार फवारणी करण्याची वेळ सर्वच बागायतदारांवर आली आहे. पूर्वी मिळणारी कीटक नाशके याची परिणामकता दोन ते तीन वेळा फवारणी केल्यावर योग्य प्रकारे दिसून येत होती. मात्र आता बाजारात मिळणारी औषधें, किटकनाशके यांचे दर सातत्याने वाढत असून दरवर्षी नवीन औषधें बाजारात येऊनही त्यात कोणत्याही प्रकारचा दर्जा नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे दहा ते बारा पेक्षा जास्त वेळा फवारणी करण्याची वेळ आंबा बागायतदारांवर ओढवली आहे. आंबा पिकाकडे कृषी विभागाने अधिकारी वर्गाने ज्या गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी मोठ्या संकटात असून मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृषी विभागाला आदेश देत योग्यती कार्यवाही करावी. बाजारात मिळणारी कीटकनाशके यांचीही तपासणी तज्ञ पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे. एकूणच या गंभीर विषयावर अधिक चर्चा करून ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील बागायतदार, व्यापाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक भरड दत्त मंदिर येथे बुधवार 24 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशीही माहिती यावेळी देण्यात आली.