शहरात मनुष्य बळी जायची वाट बघतात का ?

शिवसैनिक शब्बीर मणियार यांचा महावितरणला सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2024 14:58 PM
views 174  views

सावंतवाडी : शहरातील जीर्ण विद्युत पोल बदलण्याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या आठ दिवसात शहरातील पोल बदलण्याची कार्यवाही हाती न घेतल्यास कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

सावंतवाडी शहरांमध्ये विद्युत पोल जीर्ण झाले आहेत. गेले कित्येक वर्ष हे पोल न बदलल्याने कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे पोल बदला अशी मागणी उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख शैलेश गवंडळकर यांनी वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. आठ दिवसापूर्वी मागणी करू नही अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आज अखेर पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शब्बीर मणियार यांच्यासह शैलेश गवंडळकर, राजा वाडकर,सतिश नार्वेकर, प्रवीण वाडकरष समीरा शेख, रश्मी माळवदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कार्यालयात उप अभियंता उपस्थित नसल्याने पदाधिकाऱ्यांना सहाय्यक अभियंता दीपक खोब्रागडे यांनी उत्तर दिले. यावेळी शब्बीर मणियार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार करताना शहरातील लोकांचा जीव जायची वेळ महावितरण बघते का ? असा सवाल करत यापूर्वी घडलेल्या घटनेचा बोध घेऊन शहरातील जीर्ण विद्युत पोल तात्काळ बदला अन्यथा कोणतीही कल्पना न देता कार्यालयांना टाळे ठोकून उपोषण करण्यात असा इशारा दिला. त्यावेळी सहाय्यक अभियंता खोब्रागडे यांनी कनिष्ठ अभियंता पीयूसी चांदेकर यांना बोलावून घेत शहरातील जीर्ण पोलाचा सर्वे 10 जून पर्यंत करत हे काम पूर्ण करण्याची लेखी ग्वाही दिली. मात्र, हे काम 10 जून पर्यंत पूर्ण न झाल्यास तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकत्र करून जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.