
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएड युवक व युवतींना जिल्ह्यातच नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. हे शिक्षणमंत्र्यांचे अपयश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्यावतीने डीएड बेरोजगारांच्या संघर्ष समितीच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच येथील युवकांच्या न्याय मागण्यासाठी संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मदत करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी ओरोस येथील डीएड संघर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या उपोषणकर्त्यांना दिले.
ओरोस येथे जिल्हा परिषद डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे ११ जुलै पासून उपोषण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विधान सभा अध्यक्ष विवेक गवस यांसह अन्य पदाधिकारी व उपोषणकर्ते डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय फाले, सचिव सहदेव पाटकर तसेच बेरोजगार युवक - युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.