जालना येथे मराठा मोर्चावर झालेल्या हल्ल्याचा अर्चना घारेंकडून निषेध

Edited by: विनायक गावस
Published on: September 03, 2023 10:59 AM
views 86  views

सावंतवाडी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने संविधानात्मक मार्गाने आंदोलन चालू असताना पोलिसांनी त्यांच्यावर अतिशय अमानुष पद्धतीने लाठीमार केला. यात वयोवृद्ध महिलांसह अनेक आंदोलक बंधू भगिनी गंभीररीत्या जखमी झाले. या दुर्दैवी घटनेचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी तीव्र निषेध केला. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने आजपर्यंत अनेक विशाल मोर्चे शांततापूर्ण मार्गाने आयोजित करण्यात आले, इतर समाजाच्या बांधवांनीही या मोर्चाचे स्वागत केले. समाजात दुही निर्माण होईल किंवा हिंसा होईल अशी घटना आजपर्यंत झाली नाही. हे मोर्चे म्हणजे शांततापूर्ण मार्गाने संविधानिक पद्धनीने आंदोलन करण्याचे आदर्श उदाहरण ठरले. असे असतानाही एका छोट्याशा गावातील मोर्चा दडपण्यासाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा घेऊन सरकार पुरस्कृत हिंसा घडवणे ही बाब अतिशय संतापजनक आहे. या घटनेची सर्वपक्षीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी अर्चना घारे यांनी केली.