
सावंतवाडी : महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्चना घारे-परब सावंतवाडी मतदारसंघातून लढतील. पुन्हा एकदा हा मतदारसंघ शरद पवारांच्या ताब्यात येईल असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, सर्वजण आपापल्या पक्षासाठी मागणी करत आहे. तो एक राजकीय व्यवहार असतो. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब असणार आहेत असा शब्द अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आम्हाला दिलेला आहे. सुरेश दळवी, व्हिक्टर डॉन्टस मी स्वतः त्यावेळी उपस्थित होतो. २०१९ लाच ही उमेदवारी आम्हाला मिळणार होती. परंतु, त्यावेळी झालेली चुक आता होणार नाही. राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद देखील आमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस व उद्धव ठाकरे शिवसेना हे एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार या अर्चना घारे-परबच असतील असा दावा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केला. तर हा मतदारसंघ शरद पवारांकडेच होता. माझ्यानंतर दीपक केसरकर यांच्याकडे हा मतदारसंघ दिला. पण, ते राष्ट्रवादी फोडून शिवसेनेत गेले. नंतरच्या काळात घारेनी पक्षाला उभारी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ शरद पवारांच्या विचारांच्या नेतृत्वाकडे आणायचा आहे. शरद पवारांच सिंधुदुर्ग व सावंतवाडीवर विशेष प्रेम आहे. इथल्या मातीशी त्यांच वेगळं नात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्चना घारेच लढतील असं मत प्रवीण भोंसलेंनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.