सावित्रीची लेक 'अर्चनाताई' !

जन्मभूमीतील जनतेसाठी काम करण्यात वेगळाच आनंद : अर्चना घारे-परब
Edited by: विनायक गावस
Published on: December 01, 2023 11:19 AM
views 181  views

ग्रामपंचायत सरपंच पदापासून युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा ते राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष पदापर्यंत भरारी घेणाऱ्या अर्चनाताई घारे-परब या पेशानं सिव्हिल इंजिनिअर आहेत. महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरणावर त्यांचा विशेष भर आहे. सावंतवाडी तालुक्यातील भालावल हे त्यांचं मूळ गाव असून जन्मभूमीतील लोकांसाठी काम करता यावं, त्यांच्या ऋणातून उतराई व्हावं या उद्देशाने त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. १ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्तान कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाईव्हनं घेतलेली ही खास मुलाखत...


आपलं बालपण, शालेय जीवन हे सावंतवाडीत गेलं. काय आहे इथल्या मातीशी असलेलं तुमचं नातं ?

सावंतवाडीत माझा जन्म झाला. इथंच मी लहानाची मोठी झाले. १२ वी पर्यंतचं सगळं शिक्षण इथं झालं. सर्वात मोठी मी, माझ्यामागे एक बहीण व दोन जुळे भाऊ अशी आम्ही चार भावंडे. माझ्या आई-वडिलांनी कधीच मुलगा, मुलगी असा दुजाभाव केला नाही. सर्वांना समान वागणूक दिली. घरातून स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे अभ्यासासह सहशालेय उपक्रमात सहभागी होता आलं. त्याचा आज फायदा होत आहे. बालपणीच्या अनेक गंमती जमती आहेत. मित्रपरिवार देखील मोठा आहे. चांगले शिक्षक आम्हाला लाभले. त्यामुळे शिक्षणापलीकडचं शिकता आलं. माझा स्वभाव थोडासा मितभाषी होता. त्यामुळे आता राजकारणात सक्रीय असल्यानं जेव्हा मित्रपरिवार भेटतो तेव्हा आश्चर्य व्यक्त करतात. जत्रेत दशावतारी नाटक बघणं ही माझी आवड होती. आजही मी आवर्जून त्यासाठी वेळ काढते. जत्रेत खेळण्यांच्या दुकानात मिळणार कोडं हा आवडीचा विषय होता. आता सगळं कम्प्युटराईज झाल्यानं ही खेळणी आता दिसत नाहीत. माझं १२ वी पर्यंतच शिक्षण सावंतवाडीत झालं. सुरुवातीला मिलाग्रीस हायस्कूल त्यानंतर आरपीडी व काहीकाळ एसपीके कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. नंतर सिव्हिल इंजिनिअरसाठी रत्नागिरी येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे अॅडमिशन मिळालं. सिव्हिल डिग्री मी प्राप्त केली. त्यावेळी जेव्हा हॉस्टेलवरून सावंतवाडीत यायचे अन् मोती तलाव समोर दिसायचा तेव्हा डोळ्यात पाणी यायचं, आपली सावंतवाडी आल्याचा आनंद असायचा. इथली लोक, इथला निसर्ग, इथल्या मातीशी नाळ जोडलेली आहे त्यामुळे इथं काम करताना आनंद होतोय. आपल्या बांधवांसाठी काम करण्याची गरज आहे.

 

सावंतवाडीची कन्या पुण्याची सुनं झाली अन् बेबड ओहोळ गावच्या सरपंचपदी तुम्ही विराजमान झाला. कसा होता हा राजकीय प्रवास ?

सिव्हिल इंजिनिअरींगनंतर एक, दोन वर्षांत लग्न झालं. मिस्टर पण सिव्हिल इंजिनिअर आहेत. सासरी राजकीय पार्श्वभूमी होती‌. सासरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्याने गावात महिला आरक्षण पडलं त्यावेळी सरपंच पदासाठी माझ्या नावाचा विचार झाला. गाव मोठं आहे. सोळा इंडस्ट्रीस गावात आहेत अशा ठिकाणी सुशिक्षित महिलेला संधी द्यावी अशी मागणी होती. त्यामुळे माझं नाव सुचवलं गेल. बिनविरोध सरपंच म्हणून मी निवडून आले. तिथून राजकारणाला सुरुवात झाली. शरद पवार यांच्या २० टक्के राजकारण, ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार काम केलं. याच दरम्यान सुप्रियाताई सुळेंनी युवती राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यांच्या विचारांनी मी प्रेरीत होऊन काम करू लागले. यावेळी युवती काँग्रेस पश्चिम महाराष्ट्राच अध्यक्षपद त्यांनी दिलं.  


याच दरम्यान आपली निवड पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर झाली. उपाध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहिलं. सहकारताला अनुभव कसा होता ?

संघटनात्मक काम करत असताना पुढे जाऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून निवड झाली. पहिल्याच बैठकीत अजित पवार यांनी बॅंकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. जवळपास २० हजार कोटीचा टर्न ओव्हर असणारी ही बॅक आहे. आशिया खंडातील एक नंबरची शेतकरी, महिलांसह सर्व क्षेत्रासाठी काम करणारी ही बॅक होती. त्या बॅंकेच नेतृत्व करता आलं. शेतकऱ्यांना पीक कर्ज, महिलांच्या बचत गटांना कर्ज दिलं. शेतीपूरक अनेक योजना गावागावात राबविल्या. मोबाईल बॅकिंग अॅपसह अनेक गोष्टी राबविल्यात. सात ते आठ आमदार आजी-माजी आमदार संचालक मंडळात होते. अजित पवार स्वतः संचालक असल्याने त्यांचही मार्गदर्शन असायचं. सहकार क्षेत्रात चांगल योगदान देण्याची संधी मिळाली. अनेक योजनांबद्दल कोकणातील शेतकऱ्यांमध्ये तेवढी जागृती नाही आहे त्यांच्यासाठी काम करण्याचा आपला मानस आहे‌. पीक विमा आदीसारख्या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांनीही घ्यावा अस वाटत. त्यासाठी माझा प्रयत्न आहे.


सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी औषधाला देखील शिल्लक नाही अशा ठिकाणची जबाबदारी पक्षानं तुम्हाला दिली. आपणही ती पेलत आहात. मागे वळून पाहताना काय वाटतं ?

शरद पवार यांनी मला ही संधी दिली. जन्मभूमीत काम करण्याची माझीही इच्छा होती. सुरुवातीला लोक हसायचे. कुठल्या पक्षाचं काम करत आहात ? इथे कोण आहे तुमचं, संघटना देखील नाही अशी थट्टा केली गेली. वर्षभर तर त्यातच गेल. हळुहळु जुने-नवे असे सर्वांना एकत्र घेऊन काम करत गेलो. आता सहा वर्ष होऊन गेली. लोकांच्या आता आमच्याकडून अपेक्षा वाढत आहेत. काहीतरी राष्ट्रवादी करू शकेल हा विश्वास जनतेत दिसू लागला आहे. संघटना वाढू लागली असून त्यात स्पर्धा निर्माण झाली. गावागावात कार्यकर्त्यांचा ओघ आहे. महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यशवंतराव चव्हाण समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून देखील आम्ही महिलांसाठी काम करत आहोत. अल्पवयीन मुली ज्या गोष्टी घरी सांगू शकत नाहीत. त्यांना मदतीचा हात हवा असतो तेव्हा या माध्यमातून आम्ही त्यांना समुपदेशन करतो. कौटुंबिक समस्यांबाबत सल्ले या सेंटरच्या माध्यमातून दिले जातात. 


मतदारसंघात तुम्ही फिरत आहात. भेटीगाठी घेत आहात. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत आहात. कोणते प्रश्न आपणास जाणवले ज्याचा तुम्ही प्रामुख्याने पाठपुरावा करणार आहात ?

रोजगार आणि आरोग्य हे दोन मोठे प्रश्न इथले आहेत. मुलं हुशार असून रोजगार इथं नाही. ही भुमी बॅ. नाथ पै, जनरल जगन्नाथराव भोसले यांची जन्मभूमी तर प्रा. मधु दंडवतेंची कर्मभुमी आहे. या भुमीत प्रतिभासंपन्न लोकं निर्माण झालीत. तशीच इथली मुलं आहेत. रोजगार नसल्यानं त्यांना मनाविरुद्ध दुसरीकडे जावं लागत आहे. त्यामुळे गावं ओस पडू लागली आहेत. बेरोजगारीच सावट आमच्या जिल्ह्यात आहे. आरोग्याचा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. लोकांचा उपचारा अभावी वाटेतच जीव जात आहे. गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबईत चांगल्या उपचारांसाठी जाव लागत आहे. माझे वडील सुद्धा उपचाराअभावी वाचू नाही शकले. आम्ही त्यावेळी लहान होतो. हार्ट अटॅक आला असताना वेळीच त्यांना उपचार मिळाले असते तर कदाचित ते वाचू शकले असते. आरोग्य समस्या प्रचंड आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्लेत खुप काही करण्यासारखं आहे. पर्यटनवाढीसाठी बरंच काही करता येणार आहे. समस्या वाढत आहेत पण व्यवसायात उत्पन्नात वाढ होत नाही आहे. एमआयडीसी, रेल्वेसह अनेक प्रश्न इथं आहेत. आमच्या नेत्यांकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत. आमचा पक्ष आता सत्तेत नाही आहे. मात्र, शेतकरी, महिला, युवकांसाठी प्रामुख्याने काम करत आहे. रोजगार व पर्यटनासाठी आपला भर आहे. आयटी इंडस्ट्री, टेक्सटाईल पार्क या गोष्टी इथे होऊ शकतात. त्यामुळे इथल्या जनतेसाठी ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.

महिलांना कोणत्या समस्या आजही सहन कराव्या लागतं आहे. एक महिला म्हणून काय सांगाल ?

गावातील महिलांकडे खुप टॅलेंट आहे. परंतु, त्यांना संधी मिळत नाही. स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी इथल्या महिला प्रयत्नशील आहेत. या महिला स्वावलंबी आहेत. मात्र, त्यांना त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्याची आवश्यकता आहे.  ते त्यांना मिळत नाही आहे‌. आरोग्यासाठी महिलांची हेळसांड होत आहे. प्रसुतीसाठी देखील त्यांना इतरत जावं लागतं. महिला स्त्रीरोगतज्ञ शासकीय रूग्णालयात असावा अशी आमची मागणी आहे. आपल्याकडे स्वच्छतागृह नाही आहेत. आहेत ती स्वच्छ नाहीत. एसटी स्टँडसारख्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आहे. हिरकणी कक्ष धुळ खात आहेत. पर्यटनस्थळी चेंजीग रूम नाहीत. त्यामुळे महिलांसाठीच्या या गोष्टी करणं आवश्यक आहे. या समस्या मार्गी लागण गरजेचं आहे. ‌


सिंधुदुर्गातून आजवर महिला आमदार, खासदार झालेल्या नाहीत. तुम्ही विधानसभा लढवावी म्हणून कार्यकर्ते आग्रही आहेत. २०२४ साठीच व्हिजन काय ?

त्याला अजून वेळ आहे. लोकांसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. सिंधूकन्या असल्याचा मला अभिमान आहे‌. माझ्या मातीतल बांधवांसाठी काहीतरी करावं हेच माझं व्हिजन आहे. बेरोजगारी, आरोग्य हे प्रश्न प्रामुख्याने सोडवायला प्राधान्यक्रम असेल. जादुची कांडी फिरल्यासारखं सगळं होणार नाही. पण, यात बदल निश्चितच करायचा आहे अन् तो होईल.

महाविकास आघाडीन सहकार्य न केल्यास काय भुमिका असेल ?

त्याबद्दल आताच काही बोलणं उचित ठरणार नाही.‌ आमचे वरिष्ठ नेतेमंडळी त्याबाबत निर्णय घेतील. जनतेसाठी आपण काम करत रहायचं हा उद्देश आहे. राष्ट्रवादीचे दोन भाग झाले यावेळी खुप वाईट वाटलं. साहेब, दादा आणि ताई असा आमचा हा परिवार होता. खूप प्रेम आम्हाला या कुटुंबानं दिलं. तिघांनीही प्रत्येक वेळेला संधी दिली. अजितदादा बाजूला गेलेत याच वाईट वाटत, खंत वाटते. सर्वांनी पुन्हा एकत्र याव हीच आमची भावना आहे. मला सत्तेत गेल्यावर काही मिळालही असतं. तशी आमिषही होती. पण, काहीतरी मिळवण्यासाठी कुठे जायचं नाही हा विचार आपला पक्का आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांना सोडून जायचं नाही म्हणून त्यांच्यासोबत राहिले‌. काही मिळो अथवा न मिळो, त्याची अपेक्षा ठेवली नाही. 


महिला म्हटलं की संसार महत्वाचा. समाजाच्या संसारात वाहून देताना कुटुंबाची साथ कशी लाभली ?

सुरुवातीपासूनच पती संदीप यांची खंबीर साथ मिळाली. काम करण्याच पुर्ण स्वातंत्र्य त्यांनी दिलं आहे. मुलं व ते कुठलीच गोष्ट माझ्यापर्यंत येऊ देत नाही. संपूर्ण घरची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. माहेरी नातेवाईकांची साथ देखील तेवढीच मिळत आहे. त्यामुळेच समाजासाठी वेळ देता येतो. जनतेच्या प्रश्नांसाठी पुरेसा वेळ देऊन समाजसेवा करता येते.