
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी शुभेच्छा दिल्या. दोडामार्ग तालुक्यातील समस्त नागरिकांसाठी आजचा दिवस मोठ्या अभिमानाचा आहे.
२४ वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने दोडामार्ग तालुक्याची निर्मिती झाली त्यापैकी कोणताच मोठा उद्देश सफल झाला नसला तरी महाराष्ट्राचा नकाशावर दोडामार्ग तालुक्याचे अस्तित्व आले आहे. या तालुक्याचे अस्तित्व जरी महाराष्ट्र राज्यात असले तरी या तालुक्याचे अर्थकारण शेजारील गोवा राज्यावर अवलंबून आहे. ज्या उद्देशाने तालुक्याची निर्मिती झाली त्या उद्देशाच्या दिशेने किमान काही पाऊले तरी आजवर चालले जाणे अपेक्षित होते. येथील नागरिकांना स्थानिक भागात रोजगार, शिक्षण व आरोग्य या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आजच्या वर्धापनदिनी संकल्प करूयात. आजवर जे झाले त्याचा विचार न करता जे करायचे आहे ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केल्यास या तालुक्याचे नंदनवन होणार असा विश्वास अर्चना घारे-परब यांनी व्यक्त करत दोडामार्ग वासियांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.