विरोधीपक्षनेत्यांकडे तळकोकणातील काजू शेतकऱ्यांच गाऱ्हाण अर्चना घारेंनी मांडल

राज्य सरकारकडे हमीभाव जाहीर करण्याची मागणी करणार : अजित पवार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2023 14:49 PM
views 256  views

सावंतवाडी : सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू-बी साठी १५० रू. प्रति किलो हमीभाव जाहीर करावा अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


गेल्यावर्षीच्या तुलनेत काजू बी चे दर सुमारे २५-३०% कमी झाले आहेत. एकीकडे काजूगराचे दर वाढत असताना काजू बीचे दर कमी होत आहेत. गेल्यावर्षी मिळालेला १३५ ते १४० रुपयांचा दर यावर्षी १००-१०५ रुपयांवर आला आहे. सध्या काजूगराचा दर १२०० ते १५०० रुपये किलो आहे. मात्र, काजू-बी ला नाममात्र १०० ते १०५ रुपये किलो असा व्यापारी भाव दिला जात आहे. काजू उत्पादनातील ही तफावत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारी आहे. काजू-बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर खतांचे वाढलेले दर, कीड रोग व्यवस्थापन, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान या सगळ्यांशी झुंजत काजू उत्पादन घेणे अवघड झाले आहे. सध्या बाजारातील काजू- बी दर अत्यंत कमी असून व्यापारी मनमानीपणे दर लावत असून याला चाप लावण्यासाठी सरकारने १६० रुपयांचा हमीभाव जाहीर करावा तसेच काजू बी खरेदी केंद्र सुरू करावीत. ज्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल" अशी मागणी या निवेदनात केली आहे .

यावेळी अजित पवार यांनी "कोकणातील काजू - बी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव अन्यायकारक असून, याबाबत काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना तात्काळ हमीभाव जाहीर करण्याची मागणी करणार आहे असं आश्वासन अर्चना घारे-परब यांना दिल.