अर्चना घारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार !

Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 18:41 PM
views 31  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस सेवाभावी कार्यातून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स आणि शेतकरी मेळावा असे विविध कार्यक्रम राष्ट्रवादी पक्ष, अर्चना फाउंडेशन आणि अर्चना घारे मित्रमंडळाच्यावतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. येथील अर्चना घारे संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 


 प्रविण भोसले म्हणाले, विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी गेली काही वर्ष जनतेमध्ये जाऊन जोमाने कार्य करत आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त 12 तारीख पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शन सावंतवाडी नारायण मंदिर हॉल येथे होणार आहे. याचे उद्घाटन पत्रकार शेखर सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत पत्रकार शिवप्रसाद देसाई साहित्यिक प्राध्यापक गोविंद काजरेकर कवयित्री डॉक्टर शरयू आसोलकर अँड. नकुल फारसेकर प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर उपस्थित राहणार आहे. त्यानंतर पाच डिसेंबरला वेंगूर्ला हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मुंबई येथील डॉक्टर अजय दरेकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून करियर संदर्भात कॉन्सलिंगही ते करणार आहेत.

त्यानंतर कोचरा श्रीरामवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

असे होणार आहेत कार्यक्रम 

६ डिसेंबर रोजी थोडा मारला राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले आहे.

7 डिसेंबर रोजी कोनाळकट्टा हायस्कूल येथे मुलींसाठी स्वसंरक्षणाकरिता डॉक्टर दिनेश जाधव मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मार्गदर्शनाबरोबरच उपस्थितांना प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

८ डिसेंबरला अनसुरपाल येथे मुलींसाठी स्वसंरक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तर ९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला येथे विश्वकर्मा योजना लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात येणार आहे. तर ११ डिसेंबर रोजी आंबोली हायस्कूल येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाला पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे उपस्थिती दर्शवून त्यानंतर पुढील सप्ताह  सेवाभावी कार्यक्रमाने पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब, महिला शहर अध्यक्षा अँड.सायली दुभाषी, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, युवक शहर अध्यक्ष नईम मेमन आदी उपस्थित होते.