मी योग्य ठिकाणीच, निष्ठा बदलणार नाही : अर्चना घारे - परब

Edited by: विनायक गांवस
Published on: October 26, 2024 14:35 PM
views 392  views

सावंतवाडी : मी ज्या पक्षात काम करते. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करते. तो पक्ष तो नेता योग्यच. मी योग्य ठिकाणी आहे. मला निष्ठा बदलण्याची गरज नाही असं विधान अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. केसरकर यांनी दिलेल्या ऑफरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


त्या म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी 50 % आरक्षण देणारे, सैन्य दलात महिलांसाठी आरक्षण देऊन क्रांतिकारी निर्णय घेणारे, वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क मिळवून देणारे, देशातील पहिले महिला धोरण महाराष्ट्रात राबविणारे शरद पवार माझे नेते आहेत. जिच्या हाती पाळण्याची दोरी होती तिच्या हाती झेंड्याची दोरी देऊन माझ्यासारख्या असंख्य महिला राजकारणात सक्षमपणे काम करू शकल्या. तात्पुरती मालमपट्टी करून मतांचे राजकारण न करता महिला सक्षमीकरणासाठी चिरंतन टिकतील अशा योजना, धोरणे त्यांनी राबविली. जी कधीच बंद पडू शकत नाही . अशा नेत्याच्या सोबत मी आहे अन् यापुढेही कृतज्ञतेने राहीन.


दीपक केसरकर हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी दिलेल्या प्रस्तावासाठी मी त्यांची आभारी आहे. पण मला प्रस्ताव देऊन ते त्याच ठिकाणी राहतील याची गॅरंटी काय ? माझी वाट काटेरी असली‌ तरी, ती चुकीची नाही. स्वाभिमानाची आहे. कोकणची लाल माती आणि कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. ही स्वाभिमानी माती माझी जन्मभूमी आहे. माझ्या माता भगिनी देखील स्वाभिमानी आहेत. त्यांना बरे वाईट कळते. त्यांना खर्या खोट्याची जाण आहे. त्यामुळे त्या माझ्यासोबत राहतील याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही अस सौ. घारे यांनी सांगितले.