
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागर जाणीव यात्रेतून मी १६ ऑगस्ट पासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७५ गावांमध्ये पोहोचले. या प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडीतील लोकांशी मी चर्चा केली, त्यांच्या व्यथा व दुःख जाणून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे मी त्यांच्यासमोर मांडली. या यात्रेत एक अतिशय विदारक चित्र पाहायला मिळाले. मतदारसंघातील सर्व जनता या सरकारवर नाराज आहे. आपली दुःख सांगताना महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे चित्र वेदनादायी आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अनंत पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सौ. अर्चना घारे पुढे म्हणाल्या, सावंतवाडी मतदारसंघातील जनतेचा या सरकारवर विश्वास राहिला नाही. रस्ते, पाणी, विज हे जनतेचे प्रश्न आहेतच. मात्र रोजगाराची कोणतीही संधी येथे उपलब्ध नसल्याने आज गावागावांमध्ये तरुणांची उणीव भासत आहे. कित्येक घरे बंद आहेत. रोजगारासाठी तरुणांनी गावे सोडली आहेत. मुलांच्या आठवणीने महिला रडत आहेत. मुलांची वाट पाहण्यासाठी त्यांना रडावे लागते असे विधारक चित्र या मतदारसंघात मला जागर जाणीव यात्रेतून दिसले. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, आरोग्याच्या उपचारासाठी रूग्णांना राज्याबाहेर जावे लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर असून कुठलीही नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही. काजू बियांच्या दराचा प्रश्न तसाच आहे. बळीराजा दुःखात आहे. पूर्वीच्या सरकारने केलेल्या विकासानंतर आजपर्यंत कोणताही विकास या गावांमध्ये झाला नाही असे येथील जनतेने मला सांगितले. त्यामुळे हे सर्व चित्रपट बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडी तर्फे आम्ही एकत्र लढू असे अर्चना घारे यावेळी म्हणाल्या.