
सावंतवाडी : न्हावेली रेवटेवाडी व केनीवाडीत गेले 15 दिवस बत्ती गुल्ल आहे. महावितरण अधिकाऱ्यांना सांगून, निवेदन देऊन देखील विद्यूत प्रवाह पुर्ववत न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आज सावंतवाडी महावितरण कार्यालयाला धडक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकारी वर्गाला जाब विचारला. ज्या अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करायची नसेल अशांना ब्लॅक लिस्टेड करुन निलंबित करण्याची मागणी घारेंनी केली.
न्हावेली रेवटेवाडी व केनीवाडीत गेले 15 दिवस विद्युत प्रवाह बंद आहे. पोलवर चढण्यासाठी वायरमन नसल्याने ग्रामस्थांवर अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. वारंवार कल्पना देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना त्यांनी दिली. आज त्यांच्यासह सावंतवाडी महावितरण कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी उप कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्यानं येथील अधिकारी श्री.लोहार यांची भेट घेतली. यावेळी लोहार यांनी माझी तक्रार करा, बदली तरी मिळेल असं विधान केल्यान घारेंसह ग्रामस्थ संतप्त झाले. जोवर अधिकारी येत नाही व विद्युत प्रवाह पुर्ववत करत नाही तोवर हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला.
अखेर उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांनी अर्चना घारेंशी फोनवरून संवाद साधला. आजच्या दिवसात विद्युत प्रवाह सुरू करून देतो अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. यानंतर ग्रामस्थांनी कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ म्हणाले, केवळ वीज बिल आकारण्यासाठी ही मंडळी येतात. माणसं नाही त्यात आमचा काय दोष ? १५ दिवस लाईट नाही. आम्ही करायचं काय ? माणसं नाहीत म्हणून आमची बील कमी करणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर गावाला पुर्णवेळ वायरमन नेमण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, अर्चना घारे-परब म्हणाल्या, गेले १५ दिवस हे ग्रामस्थ अंधारात आहे. अधिकारी वर्ग यांना दाद देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्राहकांची सेवा हे महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांना लोकांची काम करायची नसतील त्यांना तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकून निलंबित करा अशी मागणी करणार असल्याच घारे म्हणाल्या. तर जोपर्यंत या ग्रामस्थांना वायरमन मिळत नाही तोवर आपण शांत बसणार नाही असा इशारा यावेळी दिला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अँड. सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, पुजा दळवी, बाबल्या दुभाषी, ऋतिक परब, ग्रामस्थ सागर जाधव, रावजी पार्सेकर, सर्वेश नाईक, सुनील नाईक, संदेश सावंत, अशोक परब, सखाराम नाईक, सुनिल परब, प्रभाकर नाईक, सिद्धेश सावंत, राजन नागवेकर, रोहीत जाधव,सुंदर झोरे, अक्षय काकतरकर आदी उपस्थित होते.