अर्चना घारेंनीही लुटला 'सांज्याव'चा आनंद

विद्यार्थ्यांना खास गिफ्ट !
Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2024 06:24 AM
views 181  views

सावंतवाडी : चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस 'सांज्याव' म्हणून साजरा केला जातो.


तालुक्यातील ख्रिस्तीबांधवांनी सांज्याव सण मोठ्या उत्साहात साजरा केला. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस 'सांज्याव' म्हणून साजरा केला जातो. बायबलमधील कथेनुसार जीजसच्या जन्माची बातमी ऐकल्यानंतर आपल्या आईच्या पोटात असलेल्या जॉन बाप्तिस्त यांनी आनंदाने उडी मारली होती. त्यामुळे विहिरीत उडी घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रघात ख्रिस्ती धर्मात आहे. धो-धो पावसामध्ये डोक्यावर रंगीत फुलांचे मुकुट घालून हातामध्ये माडाचे पिडे व वाद्यांचा गजर करीत ख्रिस्तीबांधव या दिवशी गटागटाने फिरत असतात. मौजमस्ती करीत कोकणी गाणी, कातारा गात, घुमट वाजवत सर्वजण आनंदाने नाचतात.


तालुक्यातील चराठा येथील कोसेसाववाडीमधील ख्रिस्ती बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी यांनी उपस्थित राहत ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देत आनंदोत्सवात सहभागी झाल्या. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी पिटर फर्नांडिस, डॉ. आगस्तीन डिसोझा, सुजाता फर्नांडिस, नोबेर्ट माडतिस, फॅलेक्स फर्नांडिस, आर्कजन डिसोझा आदी ख्रिस्ती बांधव भगिनी उपस्थित होत्या.