
देवगड : विजयदुर्ग किल्ल्यावर काम करणारे काही कामगार तसेच पुरातत्व खात्यातील काही कर्मचाऱ्यांचा नियमित वेतनाअभावी कामावर बहिष्कार टाकला आहे. यात विजयदुर्ग किल्ल्यावर काम करणारे काही कामगार देखील या संपात सहभागी झाले आहेत.
पुरातत्व खात्यातील कर्मचाऱ्यांचा नियमित वेतनाअभावी कामावर बहिष्कार टाकला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून अनियमित वेतन मिळत असल्याने A. S. I मुंबई सर्कल मधील साधारण १३५ हून अधिक कर्मचारी वर्गाने कामावर बहिष्कार टाकला आहे. याबाबत विजयदुर्ग येथील कामगार यशपाल जैतापकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, A. S. I मुंबई सर्कल मध्ये ११ सब सर्कल आहेत यातील काम करणाऱ्या साधारण १३५ हून अधिक कर्मचारी वर्गाने ११ जून २०२५ पासून कामावर बहिष्कार टाकला असून भविष्यात तीव्र आंदोलनाची भूमिका ठरविण्याच्या तयारीने १६ जून २०२५ रोजी मुंबई येथे सर्वजण एकत्रित येणार आहेत.मुंबई, पुणे, रायगड, अलिबाग, एलिफंटा, विजयदुर्ग, कोल्हापूर,वसई,जुन्नर,जंजिरा, सोलापूर या ११ सब सर्कल मधील सर्व कामगार एकत्रित येणार आहेत. २०२१ मधे दिल्लीवरून एक जीआर मुंबईला आला होता. यात अस्थाई कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपात किंवा १/३० स्वरूपात घ्यायचे होते. यावेळी आम्ही सर्व आमची कागदपत्रे ऑफिसला जमा केली होती.परंतू जम्मू, काश्मीर, राजस्थान सर्कल ची काम झाली. यात महाराष्ट्रातल्या संभाजीनगर सर्कल मध्ये कर्मचारी १/३० झाले. मात्र मुंबई सर्कल मधील झाले नाहीत.अनियमित पगार मिळत असल्याने या सर्व कामगार वर्गाला चरितार्थ चालवताना फार कठीण होत आहे. याबाबत विजयदुर्ग येथील यशपाल जैतापकर यांनी मा.मुख्यमंत्री खा.नारायण राणे तसेच मंत्री नितेश राणे यांना पत्राव्दारे निवेदन पाठविले असल्याचे सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची आज पर्यंत अनियमित पगारात देखील सेवा केली मात्र ४ ते ५ महिने पगार मिळत नाही. पगार झाला तर तो १ महिन्याचा मिळतो. यामुळे सर्व आर्थिक घडी कोलमडली असून कुंटुब चालवणे कठीण झाले आहे.असे यशपाल जैतापकर यांनी सांगितले आहे.