मालवण नगरपरिषदेत मनमानी कारभार : महेश कांदळगावकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 23, 2023 18:46 PM
views 175  views

मालवण : मागील दोन वर्ष निवडणुका न झाल्याने मालवण नगर परिषदेवर प्रशासकीय कारभार सुरु आहे.  वास्तविक पाहता प्रशासकीय        कालावधी मध्ये प्रशासकाचा कार्यभार हा प्रांताधिकारी स्तरावरील अन्य व्यक्तीकडे किंवा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला जातो पण सध्या मालवण नप मध्ये मुख्य अधिकारी आणि प्रशासक हा कारभार एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना कुणी समज देता का समज अशी विचारण्याची वेळ आली असल्याची टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. 

कांदळगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मुख्याधिकारी हा शासनाचा पगारी अधिकारी आहे. त्याने शहरा प्रती नगर परिषद अधिनियमाप्रमाणे काम करणे हे त्याचे कर्तव्य आहे. अशा वेळी जी कामे मुख्याधिकारी यांनी करणे बंधनकारक आहेत, जसे शहराची स्वच्छता, विकासकामे इ. , असे असताना त्याच मुख्याधिकारी यांना त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी निवेदन दिली जातात हे बघितल्यावर आमच्या सारख्या ज्यांनी 21 वर्ष त्याच नगर पालिकेमधे कर्मचारी म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्याला नक्कीच भूषणावह नाही. मुख्याधिकारी आपली कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर त्याला त्याचा  जाब विचारणे आवश्यक आहे. वरिष्ठांकडे त्याची तक्रार करणे आवश्यक असताना  जो काम करत नाही त्यालाच  निवेदन देऊन एक चुकीचा संदेश जनतेमध्ये जात आहे.  जे काम करत नाही तेच मुख्याधिकारी निवेदन स्वीकारत असल्याचे फोटो मिडीयावर येत आहेत हे आकलन न होणारे आहे. 

मागील वर्ष, दीड वर्ष आम्ही सातत्याने जी विकास कामे आमच्या कालावधीत सुरु झाली आहेत, मंजूर झाली आहेत ती बहुतांश कामे होत  नसल्या बाबत आवाज उठवत आहोत पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केला जात आहे. आताच कालावधी संपलेल्या माजी नगराध्यक्ष  करत असलेल्या सुचने बाबत जर ही स्तिथी असेल तर ते विचार करण्यासारख आहे. त्यामुळे या मुख्याधिकाऱ्यास निवेदन नाही तरं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज आहे. आम्ही दिलेल्या वर्तमान पत्रातील बातम्याची फाईल करून ठेवली त्या पेक्षा त्या बातमीत केलेल्या सूचनावर अंमलबजावणी केली असती तर ते शहराच्या दृष्टीने फायद्याचं झाल असत असा टोला देखील त्यांनी लगावला. 

भारताचे पंतप्रधान आणि आदरणीय राष्ट्रपती हे मालवण मध्ये येणार आहेत हि मालवणवासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. आणी त्या दृष्टीने शहर सुशोभीकरणाची अनेक कामे सुरु करण्यात आली आहेत. मालवण नप तर्फे सुद्धा शहरामध्ये स्वच्छतेची,  सुशोभीकरणाची काम सुरु आहेत. भिंती रंगवून स्वच्छतेचे संदेश दिले जात आहेत. जेणे करून पंतप्रधान यांच्या दौऱ्यात एक पर्यटन शहर म्हणून सादरीकरण करणे शक्य होईल.  परंतु याच बरोबर आमच्या कालावधीत जी पर्यटन दुष्टया आश्वासक आणि शहर सुशोभीकरणाची कायम स्वरूपाची जी काम केली आहेत. त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे मागील वर्षभर सूचना करूनही दुर्लक्ष केला गेलेला आहे ही वस्तुस्तिथी आहे. आज ही कामे सुस्तीथीत असती तर  शहर सौदर्यकरणात अधिक भर पडली असती. शहराची प्रवेश द्वार सुशोभीत करण्याचं काम करण्यात आली आहेत. आडारी प्रवेश मार्गावरील गणपती मंदिर नजीक सुशोभीकरण,  कोळंब प्रवेश द्वार सुशोभीकरण यांचा  समावेश आहे. पण गेले वर्षभर वारंवार सूचना करूनही यांच्या देखभाल, स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल आहे. याठिकाणी बसविलेल्या पेवर ब्लॉक मधून रान उगवलं आहे. रेलिंग बसविल्याच्या रेलिंगला काची बसविल्या त्यांची साफसफाई नाही. बसण्यासाठीचे बेंच तुटलेले आहेत. अशी दयनीय अवस्था झालेली आहे.         

शहरात बसविण्यात आलेल्या  सेल्फी पॉईंटची तिच गत् आहे.  सेल्फी पॉईंट साठी सुमारे 62 लाखचे प्रस्ताव आमच्या कालावधीत दिलेले होते. यामध्ये बंदर जेटी येथील मावळ्यांच्या फायबर च्या प्रतिकृती,  शहरातील विविध ठिकाणी बसविलेले सेल्फी पॉईंट यांचा समावेश आहे. यांची पण जरा मुख्य अधिकारी यांनी पाहाणी करून सद्य स्तिथी काय आहे हे जाणून घेण्याची गरज आहे. फक्त हे सेल्फी पॉईंट बसविले आहेत पण त्या नंतर  कोणी तिथे ढुंकूनही बघितलेले दिसत नाही. या पॉईंटच्या आजूबाजूला कचरा, धूळ यामध्ये ते पॉईंट हरवल्याची स्तिथी आहे.         फोवकांडा पिंपळ हे मालवणच्या मध्यावरती असलेले ठिकाण.  याठिकाणी असलेल्या गार्डन मध्ये लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. डेकोरेटिव्ह लाईट, रंगीत कारंजा बसविण्यात आला आहे.  पण  हा रंगीत कारंजा गेले वर्ष भर बंद आहे .आतल्या लाईट बंद आहेत.  याबाबतीतहि गेले वर्षभर पाठपुरावा करून अद्याप हे काम झाले नाही.  त्यामुळे शासनाला  दाखवण्या पुरते, रंगरंगोटी  न करता लोकप्रतिनिधिनी आपल्या कालावधीत  आपले मालवण पर्यटनदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कायम स्वरूपी केलेली  सुशोभीकरणाच्या कामांची  कायम स्वरूपी देखभाल दुरुस्ती कशी  करण्यात येईल या बाबत नियोजन केल्यास ते अधिक योग्य होणारे आहे. 

पण यासाठी नुसतं केबिन मध्ये बसून काम होणार नाही. नगरपरिषद अध्यक्ष पदाची खुर्ची ही लोकांधीमुख,  जनतेमध्ये फिरून काम करणारी खुर्ची आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे सध्या अध्यक्ष पदाचा पण कार्यभार आहे.  त्यामुळे प्रशासक म्हणून नुसतं अध्यक्षांच्या खुर्चीवर  न बसता लोकप्रतिनिधीच्या, जनतेच्या सूचना शहरामध्ये फिरून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे जेणे करून त्या खुर्चीचा मान  कायम राखला जाईल असे कांदळगावकर यांनी म्हटले आहे.