उपशिक्षक न दिल्यास आरवली ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Edited by: दिपेश परब
Published on: January 07, 2026 19:42 PM
views 37  views

वेंगुर्ले: तालुक्यातील आरवली शाळा नं १ मध्ये उपशिक्षक पद रिक्त असून अद्याप त्यावर शिक्षकांची नियुक्ती झाली नाही. यामुळे येत्या ८ दिवसात शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मंजूर पदावर तात्काळ एक उपशिक्षक द्यावा अन्यथा समस्त आरवली ग्रामस्थ व पालकवर्ग आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत वेंगुर्ले गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी यांना आरवली गावातील सामाजिक कार्यकर्ते व पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात असे म्हटले आहे की,  जीवन शिक्षण शाळा आरवली नं १ येथे एक उपिशक पद रिक्त असून अद्यापपर्यंत या पदावर शिक्षक नेमणूक झालेली नाही. शाळेतील इयता १ ते ५ वीची पटसंख्या ३१ असून दोन पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. मंजूर पदावर एक शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन कामे, कामिगरी, मिटिंगमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.

आरवली नं. १ ही केंद्रशाळा असून पुरेसे शिक्षक नसल्याने तातडीने मंजूर पदावर एक उपशिक्षक देण्यात यावा, आमच्या या मागणीचा आपण सहानुभूती पूर्वक विचार कराल अशी आम्ही आशा बाळगतो, येत्या आठ दिवसात आपण शिक्षक न दिल्यास. आम्ही लोकशाही व सनदशीर मार्गाने आरवली ग्रामस्थ व पालकवर्ग आंदोलन करणार आहोत. आणि सदर आंदोलनाच्या परीणामांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहणार आहेत असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

यावेळी आरवली वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय, माजी सरपंच मयूर आरोलकर, डॉ. साळगावकर, पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा गावडे, पालक गजानन मेस्त्री, अर्पिता रगजी, स्नेहा टेम्बकर, पूजा कर्णेकर, प्राची दळवी, समीक्षा शिंदे, श्रेया डोंगरे, स्वानंदी साळगावकर, सुचिता राणे, नेहा आरोलकर, अनन्या मेस्त्री, सुश्मिता मेस्त्री, प्राची मेस्त्री, कासम तुरेकर, गणेश पालयेकर यांच्यासहित इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

आरवली शाळा नं १ मध्ये पटसंख्येचा विचार करता ३ शिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान केंद्रशाळा असल्याने एक शिक्षक फिरतीवर असतात. यामुळे तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षक शाळेला देण्यात येईल असे आश्वासन यावेकी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांनी दिले.