
चिपळूण : “श्रीमंताच्या अंगणात चंदनाचे झाड वाढत नाही... पण निसर्गाची छेडछाड केली नाही, तर जंगल आपसूक उभं राहतं!” – हे शब्द होते अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे. आज ते आपल्या आठवणींमध्ये शिल्लक राहिले आहेत. बुधवारी त्यांचं निधन झालं आणि चिपळूणमधील रामशेठ रेडीज कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर आठवणींचा झरा वाहू लागला.
चितमपल्ली आणि रेडीज यांचं नातं हे केवळ पाहुणचारापुरतं मर्यादित नव्हतं. ते एक कुटुंबीयच झाले होते. धामणवणे येथील ‘एस. आर. जंगल’मध्ये त्यांनी जेव्हा आपल्या निसर्गलेखनाला वाहून घेतलं, तेव्हाच त्या जंगलातल्या प्रत्येक झाडासोबत त्यांचं नातं घट्ट झालं होतं आणि रेडीज कुटुंबासोबतही!
रामशेठ रेडीज आठवणीत म्हणाले, “२००१ मध्ये आम्ही समाजासाठी काहीतरी करायचं ठरवलं. चितमपल्लींचं नाव समजल्यावर त्यांचा शोध घेतला. हर्णे बंदरावर एका मच्छीमाराच्या झोपडीत राहून ते माशांवर लिहीत होते. पाण्याशी संबंधित नसलेला माणूस मास्यावर लिहितोय, हेच अद्भुत वाटलं. त्यांना चिपळूणला बोलावलं. तेव्हा त्यांनी विचारलं – 'मी नागपूरचा असूनही तुम्ही मला मदत देता?' आणि मग नातं जुळलं."
चितमपल्ली काही वेळा चिपळूणला आले की आठ दिवस तरी थांबत. “कुणालाही न सांगता, शांतपणे काम करायचं, ही त्यांची अट होती. जंगलात जात, दिवसभर लिहीत. संध्याकाळी अंधारातही ते लिहीतच असत,” असं सांगताना रेडीज आजही भारावतात.
एक दिवाळी तर खास लक्षात राहिली. चितमपल्लींना दिवाळी साजरी करायला गाडीतून आणलं, अभ्यंगस्नान घातलं, लक्ष्मीपूजन केलं. "माझी नातवंड त्यांना ‘आजोबा’ म्हणायची. त्यांच्या सोबतीत वेळ कसा गेला हे कळायचंच नाही," असे रेडीज सांगतात.
झाडांची माया हे चितमपल्लींचं वैशिष्ट्य. रेडीज यांच्या पेट्रोल पंपावर लावलेली चंदनाची झाडं मरत होती. तेव्हा चितमपल्ली म्हणाले, “रेडीजशेठ, झाडं श्रीमंताच्या अंगणात वाढत नाहीत.” आणि ते त्यांना जंगलात घेऊन गेले. झोपडीवर बी टाकून चंदनाचं झाड वाढवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली.
“त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही एक एकर जागा तशीच सोडली आणि काहीच न करता फक्त निसर्गावर सोडलं. पाच वर्षांनी तिथे खरंच जंगल तयार झालं. हे चितमपल्लींचं जिवंत ज्ञान होतं,” असं रामशेठ भावुकतेने सांगतात.
एकदा तिवडीच्या जंगलात जेवणाचा बेत झाला. त्यात चितमपल्ली सहभागी झाले. परतीच्या वेळी वस्तीनजीक बिबट्या आडवा गेला. वृत्तपत्रांनी चितमपल्ली यांच्या नावाने यावरून जंगलतोडीचं गांभीर्य अधोरेखित करत मोठी बातमी लिहिली.
“कोकणातून कोणीही त्यांच्याकडे गेला, तरी ते चिपळूणचं नाव काढायचे. आमची आठवण ठेवायचे. आज ते नाहीत, पण त्यांनी आमच्यासोबत घालवलेला काळ आणि त्यांनी सांगितलेले निसर्गाचे धडे आमच्यासोबत कायमचे राहतील,” अशा शब्दांत रामशेठ रेडीज यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.