
सिंधुदुर्गनगरी : वोटिंग मशीन अँपद्वारे ईव्हीएम तयार करत मुख्यमंत्री व अन्य मंत्री पदांसाठी निवडणूक घेत शालेय मंत्रिमंडळ पदाची निवड जिल्हा परिषद बेळणे खुर्द शाळेने केली आहे. आधुनिक पद्धतीने अशाप्रकारे निवडणूक घेणारी तालुक्यातील ही पहिली शाळा ठरली आहे. सरपंच अविनाश गिरकर म्हणाले, लोकसभा विधानसभा व इतर निवडणुका कशा होतात, त्याची प्रक्रिया काय असते याबाबत मुलांना माहिती घेण्याची उत्सुकता असते. यास पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांनी निवडणुका घ्यायच्या ठरवल्या. त्यानुसार मंत्रिमंडळासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना संधी देऊन प्रचारासाठी एक दिवस देण्यात आला.
वोटिंग मशीन ऍपद्वारे ईव्हीएम तयार करत त्यात फोटोसह उमेदवार यादी तयार करून घेतली. सोमवारी डिजिटल वर्गात प्रत्यक्ष कसे मतदान करतात हे मॉकपोल दाखवून प्रोजेक्टर ने दाखवले. ब्यालेट बटन दाबल्यानंतर पसंतीच्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो आणि विशिष्ट आवाज होतो. हे प्रोजेक्टर वरून सर्वांना सांगून नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू केली. शाळेतील ४० विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला. मतदान केंद्राबाहेर मोठी रांग लावून दरवाज्याजवळ एका विद्यार्थ्यांस पोलीस बनवले आणि रांगेवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. शिक्षकांनी मार्कर पेनने बोटावर शाई लावली. ब्यालेट युनिट सांभाळले.
विद्यार्थी खूप उत्सुकतेने या प्रक्रियेत सहभागी झाले. मतदान संपल्यावर प्रोजेक्टर ने निकाल दाखवण्यात आला. यात संस्कृती चाळके यांना ३० मते मिळाल्याने त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड जाहीर केली. आरोग्य व स्वच्छता मंत्री भावेश पुजारे यांना २८ मते मिळाली, क्रीडामंत्री श्रेयस चाळके यांना २८ मते मिळाली, सांस्कृतिक मंत्री करण चाळके यांना २४ मते मिळाली. निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व गुलाल लावून आनंद साजरा केला.
शेवटी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्र्यांचे गुलाबपुष्प देऊन सरपंच अविनाश गिरकर यांनी अभिनंदन केले. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, याची माहिती उपस्थिती शिक्षकांनी दिली. यावेळी ऊपसरपंच पंढरीनाथ चाळके, सदस्य सिध्दार्थ तांबे, संघवी,शर्मिला तांबे,राजेंद्र चाळके, शाळा समिती अध्यक्ष गणेश गिरकर,महिपत मुळम,केंद्र प्रमुख शिवाजी पवार,वळवी, लक्ष्मी चाळके,स्वप्नाली चाळके,शाळेचे मुख्याध्यापक क्रांती सामंत, मंगेश राणे,दिप्ती सावंत,पूजा मुसळे,शालिनी हरकुळकर,पालक उपस्थित होते.