ऑन कॉल रक्तदाते संघटनेचं कौतुकास्पद काम

तीन रुग्णांचे वाचविले प्राण
Edited by:
Published on: February 14, 2025 15:10 PM
views 176  views

सावंतवाडी : ऑन कॉल रक्तदाते संघटनेच्या माध्यमातून गेल्या चार-पाच दिवसांत वेगवेगळ्या प्रसंगी रक्तदात्यांनी त्वरीत जाऊन रक्तदान करुन तीन रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. ऑन काॅल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर व सचिव बाबली गवंडे यांच्या पाठपुराव्यामुळे हे रक्तदान यशस्वी झाले आहे.

गंभीर अवस्थेतील अत्यवस्थ रुग्ण तसेच ह्रदयरोगग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज असताना तातडीने रक्तदानासाठी रक्तदाते पाठवून ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग मार्फत रुग्णांचा बहुमोल जीव वाचविला जातो. आणि रक्तदात्यांच्या जीवावर ही संस्था हे कार्य निरंतर करीत आहे. संस्थेच्या क्रियाशील कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी हे कार्य पूर्णत्वास नेले जाते. एकतर इमर्जन्सी काही सांगून येत नाही आणि आलीच तर संस्थेचे ऑन काॅल रक्तदाते जीवावर उदार होऊन जातातच आणि रुग्णांचा बहुमोल जीव वाचवितात. या पाश्वभूमीवर सर्वप्रथम सांगेली ता. सावंतवाडी येथील सुप्रिया सुनिल राऊळ या पेशंटला लाईफटाईम हाॅस्पिटल, पडवे-कसाल येथे ह्रदयशस्त्रक्रियेसाठी चार फ्रेश रक्तदात्यांची तातडीची गरज भासली. यासाठी ऑन काॅल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर व सचिव बाबली गवंडे यांनी पाठपुरावा करताच सांगेलीहून प्रसाद परब व विठ्ठल राऊळ तर वेंगुर्ल्याचे बाबल घाटकर व सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वित्तीय अधिकारी रोहीत पावरा या चौघांनी तातडीने एस् एस् पी एम् पडवे रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.

त्यानंतर कोलगाव-निरुखे येथील अपघातग्रस्त महिला उज्ज्वला उमेश राऊळ या फ्रॅक्चर झालेल्या दूर्मिळ ओ निगेटीव्ह रक्तगटाच्या पेशंटसाठी सांगेलीचे पंढरी सावंत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत जीएमसी बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. या पोस्टसाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य दिनेश गावडे, समूहसदस्य प्रसन्ना पटवर्धन व सुहास गावडे यांनी प्रयत्न केले.अन्य एका घटनेमध्ये जीएमसी बांबोळीमध्ये डेगवे ता. सावंतवाडी येथील सत्यवान वराडकर या रुग्णाला बायपास शस्त्रक्रियेसाठी फ्रेश रक्ताची आवश्यकता असताना सदर पोस्ट संस्थेचे ऑन काॅल रक्तदाते चिंतामणी खोत व समूहसदस्य आत्माराम गवस यांनी सदर पोस्ट समूहावर पाठविताच संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी सदर पोस्टचा यशस्वी पाठपुरावा केला व त्यांच्यामार्फत सांगेलीचे समीर सावंत, सतीश जोशी, ओंकार धुरी व कारीवडे येथील सिद्धेश केदार आदि रक्तदात्यांनी ताबडतोब जीएमसी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले.सर्व तीनही पेशंटच्या नातेवाईकांनी ऑन काॅल रक्तदाते संस्थेसहीत समयसुचकता दाखविलेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत. योग्य वेळेवर पाठपुरावा करुन रुग्णांना जीवनदान देणार्‍या रक्तदात्यांना संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस व कार्यकारिणीने धन्यवाद दिले आहेत. अशा या ऑन काॅल रक्तदात्यांच्या जीवावरच ही संस्था प्रगतीपथावर असून या रक्तदात्यांच्या जिवित्वाची हमी म्हणून त्यांच्यासाठी ग्रुप इन्श्युरन्स सुरु केला आहे व रक्तदात्यांना सहाय्य केले आहे, तसेच भविष्यात नवनवीन संकल्पना संस्था अमलात आणणार आहे, असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी व्यक्त केले आहे.