
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या तात्काळ नियुक्त्या करण्यात आल्या असुन त्यांना रुग्णालयातील उपस्थितीचे दिवस ठरवून देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन या रुग्णालय संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. या रुग्णालयाचा कारभार लवकरात लवकर सुरळीत सुरू होईल त्यासाठी मंत्री केसरकर प्रयत्नशील आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी आज दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग व असुविधा, औषधांची टंचाई आदिवरून मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना विरोधकांनी टार्गेट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तालुका प्रमुख गणेशप्रसाद यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील डॉ. डी. ए. एवळे ( स्त्री रोग तज्ञ ) हे दोडामार्ग मध्ये मंगळवार व गुरूवार या दिवशी उपलब्ध राहणार आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथीलच डॉ. धीरज सावंत ( स्त्री रोग तज्ञ ) बुधवारी, शुक्रवार उपलब्ध असणार आहेत. शिवाय डॉ. आकाश एडंके यांनाही दोन दिवस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे असेही श्री. गवस यांनी स्पष्ट केले. शिवाय सोमवारी 20 रोजी पासून करण्यात येणारे रुग्णालय बंद आंदोलन करण्यात येऊ नये असेही आवाहन केसरकर यांनी केले असून रुग्णालयाचा कारभार चांगला चालण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत असेही केसरकर यांनी स्पष्ट केल्याने गणेशप्रसाड गवस म्हणाले.