
सावंतवाडी : शहरातील मध्यवर्ती असलेल्या राजा शिवाजी चौकात गेल्या आठ दिवसांपासून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुंबईहून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत आहेत. त्यातच चौकात बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या महत्त्वाच्या चौकात पूर्वी नेहमी वाहतूक पोलीस तैनात असायचे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून त्यांची गैरहजेरी जाणवत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी तातडीने राजा शिवाजी चौक आणि एसटी स्टॅड परिसरात दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीमुळे रस्त्यांवरील वाहनांची व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल असे येथिल व्यापारी, नागरिकांचे म्हणणे आहे.