
कणकवली : स्वच्छता मिशन, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमे राबविण्यात येते रविवारी जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम राबवत स्वच्छता मिशनचे सर्व स्वच्छता दूत यानी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे एकत्र येत सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीने रत्नागिरी रेल्वे स्टेशन व पुन्हा नांदगाव रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवास करत आमचा स्वच्छ व पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा असून कृपया प्लास्टिक कचरा बाहेर टाकू नका असे प्रवाशांना आवाहन केले.
सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसह स्वच्छता शपथ घेऊन राष्ट्रगीत म्हणून उपक्रमाला सुरुवात केली यावेळी स्वच्छता मिशनचे गणेश जेठे,मंडळ अधिकारी दिलीप पाटील, स्वच्छता ब्रॅड अॅम्बेसिडर रोहित मोंडकर, पत्रकार संजय सावंत, मोहन पडवळ, तुषार नेवरेकर गुरूप्रसाद सावंत, सचिन राणे, प्रा. एम. बी.शेख , तालुकाप्रमुख प्रिया टेमकर याच्यासह स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते.दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप घावरे,नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर व प्रवाशांनी सर्व स्वच्छता दूत याच्या मोहीमेत सहभाग घेतला.
नांदगाव येथून रेल्वेने प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे डब्यात जाऊन प्रवाशांना स्वच्छता संदेशाचे प्रत्रक देऊन आमचा कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच. त्याशिवाय देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा आहे. कोकण प्रांत मुळात स्वच्छ आहेच. त्यामुळे स्वच्छ कोकण यापुढेही स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई असो वा कुठचाही प्रवास करताना रेल्वेगाडीच्या खिडकीतून आपण चहाचे कप व इतर खाद्यपदार्थ व अन्नपदार्थही बाहेर फेकू नये.आपल्या डब्यामध्ये जी डस्बीन ठेवली आहेत अथवा स्टेशन वरील डस्बीनचा कृपया वापर करावा व कोकणचा निसर्ग आणि स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे असे स्वच्छता दूत यानी सर्व १६ ही डब्यातील प्रवाशांना संवाद साधत नांदगाव ते रत्नागिरी व पुन्हा रत्नागिरी ते नांदगाव असा रेल्वे प्रवास करत संदेश दिला.
यावेळी अनेक प्रवाशांनी आत्मियतेने या मोहिमेचे स्वागत करत आपण जी स्वच्छतेची देशसेवा करत आहात ती अशीच सुरू राहूदे यासाठी आम्हीही सहकार्य करू अशी ग्वाही देत संदेश मिळताच अनेकांनी आपल्या जवळील प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थ व इतर टाकावू वस्तू एका पिशवीत साठवून ठेवत असल्याचे दाखवित स्वच्छतेला आपलाही पाठिंबा असल्याचे दाखवून दिले.यावेळी रेल्वे अधिकारी यानी या उपक्रमाचे कौतुक करत आपण सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन मार्फत जो उपक्रम राबवत आहात यासाठी गौरवोद्गार काढले. यावेळी रेल्वे खाद्यपदार्थ विक्रेते सुनिल बोर्डवेकर, कांचन आमने यानीही आपणही आपल्याप्रमाणेच प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देऊ असे सांगत अल्पोपाहार मोफत दिला.या मिशनसाठी पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यानी जिल्हा परिषद मार्फत टी शर्ट व टोप्या उपलब्ध करून दिल्या.दररोज प्रवाशाची जास्त संख्या असणा-या रेल्वेमध्ये अशाप्रकारे प्रथमच सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत.