अनुजाची ‘भरारी’...आनंद शेटये यांनी दिले ‘आकाश’

Edited by:
Published on: July 15, 2025 21:37 PM
views 13  views

दोडामार्ग : ‘निराधार आभाळाचा तोच भार साहे...!’ तसं पाहिलं तर हातावरचं पोट, शेतात राबून स्‍वत:चा चरितार्थ चालविणार्‍या मायपित्‍यासाठी आपली लेकरं मोठी व्‍हावीत, असं मनोमन वाटतं. प्रसंगी स्‍वत:च्‍या पोटाला चिमटा काढत, मुलांच्‍या भविष्‍यात आनंद शोधणार्‍या ‘आई-बाबांचे’ कष्‍ट हीच खरी त्‍यांच्‍यासाठी प्रेरणा! आणि या कष्‍टाचं चीज करणार्‍या पोरीनं जर बापाचं नाव काढलं, तर त्‍यांच्‍या डोळ्यांतील आनंदाश्रू जेव्‍हा सुरकुतलेल्‍या चेहर्‍यांवरून ओघळतात, तेव्‍हा हा कुटुंबातील एक सुवर्णक्षण असतो. दोडामार्ग तालुक्‍यातील हेवाळे गावची सुकन्‍या अनुजा देसाई, मेहनत, चिकाटी, जिद्द यांची परिसीमा ओलांडून अत्‍यंत कठीण ‘जेईई’ परीक्षेत देशातून ५८८वी रँक मिळवली, अन्‌ दोडामार्ग तालुक्‍याबरोबरच सिंधुदुर्गचे नाव उज्‍ज्‍वल केले.  दिल्लीत इलेक्‍ट्रीकल्‍स इंजिनिअर होण्‍याचा मार्ग मोकळा झाला खरा पण पुढचा शिक्षणासाठीचा लाखोंचा खर्च पेलणार कसा? एकीकडे आनंद तर दुसरीकडे धास्‍ती असणार्‍या कुटुंबियांच्‍या मदतीसाठी धावले समाजाप्रती नेहमी दातृत्‍व दाखविणारे आणि सामाजिक बांधीलकीतून या मातीतलं जिव्‍हाळ्याचे नाते जोपासणारे दोडामार्ग तालुक्यातील खानयाळेचे सुपूत्र उद्योजक आनंद शेटये!  अनुजाच्‍या ज्ञानाची भूक, ओढ आणि तळमळ पाहून शेटये भारावले, अन्‌ त्‍यांनी अनुजाच्‍या पुढच्‍या शिक्षणाची जबाबदारी एका क्षणात घेतली. तिच्‍या स्‍वप्‍नांच्‍या पंखांना बळ दिले. तिच्‍या पदवीपर्यंतचा शिक्षणाच्‍या खर्चाचा भार आनंद शेटये उचलणार आहेत. शेटये यांच्‍या या दातृत्‍वानंतर देसाई कुटुंबियांचेही डोळे काही क्षण पाणावले.  

ज्ञान म्हणजे केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि स्वप्नांच्या उंचीवर पोहोचण्याचा मार्ग आहे. हेवाळेची सुकन्‍या अनुजा देसाई हिने अत्‍यंत खडतर परिस्‍थितीत ‘जेईई’ची परीक्षा दिली, अन्‌ तिने ५८८वी रँक मिळवत आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेण्‍याचा तिचा मार्ग मोकळा झाला. अनुजाचे आई वडिल शेती करतात, आणि भाऊ गोव्‍यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्‍यामुळे पुढचे शिक्षण कसे पूर्ण करावयाचे, असा तिच्‍यासमोर गहन प्रश्‍न निर्माण झाला. साधारणत: सहा ते सात लाखांपर्यंतचा हा खर्च होता, आणि ते या गरीब कुटुंबाला पेलविणारे नव्‍हते. अनुजाच्‍या या उज्‍ज्‍वल यशाची गोष्‍ट दोडामार्गचे सुपूत्र आणि उद्योजक आनंद शेटये यांच्या कानावर जाताच त्‍यांनी कोकणसादचे संपादक तथा हेवाळे गावचे माजी सरपंच संदीप देसाई यांच्याशी संपर्क साधला. अनुजाची शैक्षणिक गरुडझेप बाबत सविस्तर चर्चा करत देसाई कुटुंबियांशी संवाद साधला. आणि त्याचक्षणी अनुजाच्या भरारीला आकाश मोकळं करून देत तिच्या पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी  घेतली. त्यानंतर मुंबई हुन दोडामार्ग मध्ये दाखल होतं त्यांनी थेट हेवाळे गाव गाठलं. आणि अनुजाच्‍या पुढच्‍या शिक्षणाचा भार त्‍यांनी उचलला. यावेळी अनुजाच्‍या आई वडिलांच्‍या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. 

हा विश्‍वास मी सार्थ ठरवेन...

माझ्‍या आई वडिलांचे आशीर्वाद आणि ध्‍येयपूर्तीमुळे मला हे यश मिळाले. आज उद्योजक आनंद सरांनी येथे येत माझे अभिनंदन केले, आणि पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली, त्‍याबद्दल मी त्‍यांची आभारी आहे. त्‍यांनी माझ्‍यावर दाखविलेला विश्‍वास नक्‍कीच सार्थ ठरवेन. आणि माझ्‍या गावाचे पर्यायाने दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्‍ह्याचे नाव उज्‍ज्‍वल करण्‍यासाठी माझ्‍यापरिने प्रयत्‍न करेन, असे अनुजा देसाईने सांगितले. 

माझं पहिलं कर्तव्‍य म्हणूनच शैक्षणिक खर्च उचलणार : आनंद शेटये

जगात अशक्‍य असे काही नाही, मेहनतीचे फळ हे मिळतेच. मी सुद्धा एका सामान्‍य शेतकरी कुटुंबातून आलोय. त्‍यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न मी जवळून अनुभवलेय. आपल्‍या भागातील,आपल्‍या मातीतील ही मुलं जर अशी भरारी घेत असतील तर माझं पहिलं कर्तव्‍य आहे, त्‍यांना मदत करणे. त्‍यासाठीच मी अनुजाचा ग्रॅज्‍युएशनचा सर्व खर्च उचलणार आहे. खूप मोठी हो, तुझ्‍या शैक्षणिक वाटचालीसाठी माझ्‍याकडून शुभेच्‍छा असे उद्योजक आनंद शेटये यावेळी बोलताना म्‍हणाले.