
मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विकास सावंत यांच्या निधनामुळे एक समर्पित व अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
विकास सावंत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विकास सावंत हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. वडील माजी मंत्री भाई सावंत यांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. विनम्र स्वभाव, राजकीय शुचिता आणि सामाजिक प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची तळमळ या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीपासून ते स्थानिक प्रश्नांवर लढा देण्यात ते सदैव अग्रेसर राहिले. समाजकारणीसोबतच कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.
विकास सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सावंत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.