
मालवण : समुद्राला आलेल्या उधाणाचा तळाशील किनाऱ्याला फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. आज आलेल्या उधाणाच्या भरतीत मोठ्या प्रमाणात किनाऱ्याचे क्षेत्र समुद्राने एका दिवसात गिळंकृत केले आहे. हे उधाण आणखी तीन दिवस टिकणारे असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. बंधाऱ्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहणी करण्यासाठी आलेल्या पतन विभागाच्या सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांना आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत बंधाऱ्या बाबत उपाययोजना होत नाही तोपर्यंत जाऊ देणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला.
गेले चार दिवस सातत्याने येणाऱ्या उधाणा बरोबरच मंगळवारी सकाळी आलेल्या उधाणाचा वेग एवढा होता की, काही क्षणात तळाशील किनाऱ्याचा लांबच्या लांब पट्टा गिळंकृत केला. ज्या भागास बंधारा आहे तो भाग शिल्लक राहिला आहे. किनारा आणि रस्ता यामधील अंतर हे 10 फुटाचे शिल्लक राहिले आहे. सागरी लाटा तळाशीलच्या वस्तीच्या दिशेने आक्रमण करत आहेत. त्यामुळे तळाशीलवासीय भीतीच्या छायेखाली आहेत. आज तळाशील येथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या पतन विभागाचे सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला. जोपर्यंत तातडीने उपाययोजना होत नाही तोपर्यंत इथून जाऊ देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. जोपर्यंत सक्षम अधिकारी येत नाहीत तातडीची उपाय योजना हाती घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. तळाशील ग्रामस्थ माजी सरपंच संजय केळकर, संजय तारी, संतोष कांदळगावकर, आनंद कोचरेकर, दत्तात्रय तांडेल, विद्याधर पराडकर, पुंडलिक टिकम, गणेश रेवडकर, विवेक रेवडकर, पांडुरंग तारी, प्रकाश बापर्डेकर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.