महावितरणच्या दुर्लक्षाचा आणखीनं एक बळी | सुदैवानं बचावला शेतकरी

Edited by: विनायाक गावस
Published on: July 06, 2023 11:00 AM
views 83  views

सावंतवाडी : शेतात गुरांना चारायला नेलेले असताना तुटलेल्या विद्युत भारित वाहिनीचा शॉक लागून बैल जागिच गतप्राण झाला.मळगाव कुंभारवाडी येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाणारा शेतकरी तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला झाला अन्यथा अनर्थ घडला असता.न्हानू दशरथ खडपकर असे या शेतकऱ्याचे नाव असून पण शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार, वायरमन प्रितेश हळदणकर, संतोष गांवकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तत्पूर्वी या घटनेची माहिती श्री पंचम खेमराज चे निवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी महावितरण ला दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत पशुधन अधिकारी कृषी अधिकारी व तलाठी यांना कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे.

त्यानंतर महावितरणचे ओरोस सिंधुदर्ग येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार असून बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल अशी माहिती लोहकरे यांनी यावेळी दिली. दरम्यान, महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या कमजोर झाल्या असल्याची माहिती आपण वेळोवेळी दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला नशिबाने शेतकरी वाचला अन्यथा मोठा प्रसंग उडवला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी गणपत शिरोडकर यांनी व्यक्त केली.

यावेळी सरपंच स्नेहल जामदार, स्थानिक शेतकरी गणपत शिरोडकर, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य अनुजा खडपकर, बाबुराव खडपकर, सद्गुरु शिरोडकर, मंगेश खडपकर, रोहित शिरोडकर, आनंद राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ खडपकर आदी उपस्थित होते.