
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावठाण वाडी येथे आणखी एक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र विठ्ठल देसाई यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. देसाई दांपत्य सध्या उपचारासाठी बांबुळी (गोवा) येथे गेले असून, मुंबईहून घरी आलेला त्यांचा मुलगा संध्याकाळी घरी प्रवेश करताच घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची पाचारण दोडामार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरट्यांनी नेमक्या कोणत्या वस्तूंची चोरी केली याचा तपास सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास हाती घेतला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अशा प्रकारच्या वारंवार घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने गस्त वाढवावी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांवर प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.










