
वेंगुर्ले : दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेले वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख देवस्थान चा वार्षिक उत्सव रविवारी १७ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवाला श्री देव घोडेमुखच्या ३६० चाळ्यांना कोंब्यांचा बळी दिला जातो यामुळे ही जत्रा "कोंब्यांची जत्रा" म्हणूनही प्रसिद्ध आहे. यानिमित्त सकाळपासून दिवसभर मंदिराच्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.
भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे श्री घोडेमुख हे वस्तीस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती, भूत पिशाच्यागण यांचा नायक म्हणून याचा याठिकाणी वास आहे. निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या मंदिराचे दर्शन दूरवरून भाविकांना होते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ७०० ते ८०० मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. आबालवृद्ध भाविक श्रद्धेने हा डोंगर पार करून श्री देव घोडेमुखचे दर्शन घेतात. श्री देव घोडेमुखच्या या उत्सवाला गोवा, मुंबई, कर्नाटक, कोल्हापूर सहित इतर भागातुन अनेक भाविक या आवर्जून उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतात.