
सिंधुदुर्ग : मराठी भाषा ही ऐतिहासिक परंपरा लाभलेली भाषा आहे. या भाषेत आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी अनमोल योगदान दिले आहे. त्यासोबतच मराठी भाषेत अनेक बोली भाषा आहेत. त्यात अनेकांनी लक्षणीय साहित्याची रचना केली आहे. त्यामुळे या बोली भाषेतील बोली भाषेच्या विकसनासाठी अध्यासन केंद्र असावे या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांची मागणी रास्त असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने याच बोली भाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अध्यासन केंद्राची घोषणा करत असल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांनी केली.
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५ व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पाच पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मधुभाई यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यासोबतच नवलेखकांना लिहिते करण्याची संधी मधुभाई यांनी कोकणाला उपलब्ध करून दिली. तसेच काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला; पण अगदी पूर्वीपासूनच मराठी भाषा ही अभिजात असल्याचे गौरवोद्गार काढत विश्व साहित्य संमेमनात देण्यात येणाऱ्या साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम १० लाख रुपये करण्यात येणार असून, येणाऱ्या काळात उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी देखील एक वाङमयीन पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा उदय सामंत यांनी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना साहित्याच्या विविध अंगाचा विचार करून मधुभाई यांनी साहित्य निर्माण केले. त्यांनी अत्यंत निर्विकारपणे साहित्य क्षेत्रात योगदान दिल्याचे सांगतांना कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले.
त्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी कार्यक्रमाबाबत भूमिका मांडताना मधुभाई यांच्या योगदानाबद्दल माहिती देताना मधुभाई यांनी दिलेल्या विचारानुसार कोकणात साहित्यिकांची साहित्यसूची तयार करण्याचे काम कोमसापच्या वतीने सुरू असून बोली भाषा संवर्धन आणि संरक्षण होणे आवश्यक असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितारणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे. ईश्वरकृपेचा साहित्यिक साक्षात्कार म्हणजे मधु मंगेश कर्णिक म्हणजे माहीमची खाडी ते तारकर्ली अशी ७५० किमीची भूमी कवेत घेणारा मराठी साहित्यिक यापूर्वी कधी झाला नाही. त्यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून कृतकृत्य वाटत असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. तर माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मधुभाई यांच्या योगदानाचे कौतुक करत भविष्यात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अनेक उपक्रमाचा माध्यमातून कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे आणि त्यातीलच बारकावे रेखाटण्याच्या त्यांच्या साहित्यशैलीमुळे त्यांचे साहित्य भावते असे सांगत त्यांच्या साहित्याचे मर्म उलगडले.
या संपूर्ण अत्यंत संस्मरणीय कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कारमूर्ती मधु मंगेश कर्णिक यांनी सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाचकांचे प्रेम हीच माझी ऊर्जा असून काळाच्या ओघात माझे साहित्य टिकेल की नाही हे मी सांगू शकणार नाही. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि कवी केशवसुत स्मारक ही माझी हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात राहतील असा विश्वास दिला.
यावेळी मॅजेस्टिक, मौज आणि उत्कर्ष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या मधु मंगेश कर्णिक यांच्या गूढ-निगूढ, स्वयंभू, उधाण, स्मृतिजागर' आणि राजा थिबा या पाच पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या लोकांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. तसेच पनवेल, रायगड येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक पनवेल टाइम्सने संपादित केलेला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मधुभाई यांच्या कवितांचे गाणे प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी सादर केले. तसेच त्यांच्या कार्यावर आधारित चित्रफीत दर्शविण्यात आली. त्यानंतर उत्कर्ष प्रकाशनचे सु. वा. जोशी, मौज प्रकाशनाच्या मोनिका गजेंद्रगडकर आणि मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनी पुस्तक प्रकाशन संदर्भात मते व्यक्त करत मधुभाई यांच्या लेखनाचे कौतुक केले. तर यावेळी कोमसाप मुंबई जिल्ह्याच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याचे वाचन दादर शाखेच्या अध्यक्षा विद्या प्रभू यांनी केले. यावेळी मधुभाई यांची पुस्तकतुला करण्यात आली. त्यातील सर्व पुस्तके मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकातील ग्रंथालयास देण्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हेमंत टकले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कोकण मराठी साहित्य परिषदेची केंद्रीय कार्यकारिणी, विविध समित्यांचे प्रमुख, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृन्मयी भजक तर सर्वांचे आभार प्रदर्शन मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज वराडे यांनी केले.