दोडामार्गमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलनाची घोषणा..!

सुरेश दळवींच्या सहकार्याने येत्या आठ ते दहा दिवसात पहिलं नाट्य संमेलन | सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गवस यांची माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: March 02, 2024 14:50 PM
views 57  views

दोडामार्ग : राज्यातील नाट्य चळवळीला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आलेली आहेत. त्यामुळे दोडामार्ग येत्या ८ ते १० दिवसात दोडामार्ग तालुक्यात पाहिले अखिल भारतीय तालुका स्तरीय नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी संस्थेतर्फे या नाट्य संमेलनाचे दोडामार्ग मधील लोकनेते सुरेश दळवी यांच्या सहकार्याने भव्य दिव्य आयोजन केल जात आहे अशी माहीती  सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गवस यांनी दोडामार्ग येथे दिली.

प्रथमच दोडामार्ग मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या या संमेलनाची माहिती देण्यासाठी येथील दळवी कॉम्प्लेक्स मध्ये सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी या संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी श्री. गवस बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, जेष्ठ नाट्यकर्मी गोविंद महाले, गोविंद शिरोडकर, युवा नाट्य कलाकार गणेश ठाकूर, ऍड. सोनू गवस, संस्थेचे सचिव प्रा. संदीप गवस, ऍड. दाजी नाईक आदी उपस्थित होते.  यावेळी अधिक माहिती देताना प्रकाश गवस म्हणाले की, आपल्या राज्यासोबत कोंकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही नाट्यकलेचा एक आगळावेगळा वारसा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेला आपला दोडामार्ग तालुका देखील त्याला अपवाद नाही. तालुक्यात नामवंत शैलीचे अनेक दिग्गज कलाकार आहेत. ज्यांची कला अद्यापपर्यंत मोठ्या प्लॅटफर्मवर येऊ शकली नाही. कौटुंबिक जबाबदारी तसेच अन्य कारणास्तव हे कलाकार नाट्य कलेच्या प्रवाहापासून काहीसे दूरच राहिले आहेत. अशा किमान शंभर कलाकारांना एकत्रित आणून त्यांची या संमेलनाच्या माध्यमातून ओळख करून दिली जाणार आहे. त्यांचा यावेळी यथोचित मानसन्मान देखील केला जाणार आहे. या चळवळी मुळे दोडामार्ग मधील नाट्य क्षेत्राला एक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

दोडामार्ग मधील नाट्यप्रेमिंनी हे नाट्य संमेलन आयोजित करण्याची आमची इच्छा सिंधुदुर्ग जि. प. चे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी यांच्याकडे बोलून दाखविली. तेव्हा त्यांनी संमेलनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे नाट्य संमेलन आयोजित करत आहोत. तसेच संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी सुरेश दळवीं यांचीच  निवड करण्यात आली असल्याची माहिती श्री. गवस यांनी दिली.