
सावंतवाडी : साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचालित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीचा पाचवा वर्धापन दिन नुकताच सावंतवाडी मधील आदिनारायण मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व अभ्यागातांचे स्वागत प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकर्षक फुलांनी करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी भारतीय ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्यवीरांचे व थोर पुरुषांचे पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. अनेक मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरे केले तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तांच्या जीवनावरील प्रसंग कथन केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात केंद्रामधून राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने स्मिता गावडे 100 मीटर धावणे सुवर्णपदक तर भालाफेक मध्ये रजत पदकप्राप्त केल्याबद्दल व जोस्तीम डिसोजा हिने गोळा फेक मध्ये रजत व राज्य क्रिकेट स्पर्धेत सहभागाबद्ल या खेळाडूंना गौरवण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने व रूपाली मुद्राळे हिच्या पुढाकारातून मुलांना क्रीडा साहित्य भेट म्हणून देण्यात आले व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राच्या अध्यक्षा सौ. रुपाली पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अँड. बापू गव्हाणकर यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्यांचे विशेष कौतुक केले व येणाऱ्या काळात आर्थिक पाठबळ देण्याचे जाहीर केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक शैलेश नाईक यांनी या दिव्यांग मुलांमध्ये लपलेला "सिक्सथ सेन्स" चा शोध घेण्याचा प्रयत्न पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने करावा असे सुचित केले. सदर विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या विशेष प्रशिक्षणासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अण्णा देसाई, अरुण मेस्त्री व सामाजिक बांधिलकीच्यावतीने संजय पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिव्यांगांसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने अशोक दळवी व गजानन नाटेकर यांनी शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, संजय पेडणेकर,अशोक पेडणेकर, श्रीम.समीरा खालील,रवी जाधव, शामराव हळदणकर, सुजय सावंत, शेखर सुभेदार, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, अमोल साटेलकर, प्रशिक्षण केंद्राचे उपाध्यक्ष सखाराम नाईक, सचिव न्हानू देसाई , श्रीम. द्रौपदी राऊळ व प्रवीण सूर्यवंशी, प्रणाली पेंडसे व विद्यार्थ्यांचे पालक- हितचिंतक आणि आश्रयदाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीम. अंकिता राऊळ यांनी केले.