
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व सावंतवाडी श्री श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वाचक स्पर्धा लेखक जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकिता संतोष पाटील, द्वितीय तन्वी गणेश परब, तृतीय प्रगती सदानंद परांजपे, उत्तेजनार्थ सृष्टी प्रशांत पाटील यांनी पटकाविला. हे स्पर्धक जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ जिल्हा ग्रंथालय येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.
गुरुवारी सायंकाळी ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम, संचालक भरत गावडे, संचालक अँड. संतोष सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, आरती मासिकचे प्रभाकर भागवत, प्रा. जी ए बुवा, रवींद्र भागवत, वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना आरती मासिकचे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भागवत म्हणाले, आपल्याला संस्कार करणारे साहित्य वाचायला हवे, प्रश्न निर्माण करणारे साहित्य हवे. दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता येते असे साहित्य संग्रह वाचायला हवे.
खरंतर अनेक लेखकांनी अनेक साहित्यिकांनी लिखाण केले आहे. शामची आई, साने गुरुजी यांचे साहित्य संस्कार करणार आहे. असे साहित्य लेखन वाचायला हवे. प्रश्न निर्माण करणारे साहित्य लेखन साने गुरुजींच्या कथासंग्रहामध्ये आहे. काही साहित्य लेखन हे फसवणारे असते. ज्या साहित्य वाचनातून आपल्याला संस्कार मिळतात असे साहित्य लेखनच वाचायलाच हवे. तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हाच तुम्ही काहीतरी लिहू शकता, बोलू शकता. म्हणून तुमचे हात लिहिते व्हायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. जी ए बुवा यांनी यावाचक स्पर्धेतून तुम्ही जे जयवंत दळवी यांच्यावर भाष्य केला ते भाष्य तुम्ही लिखाणातून सादर करा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विठ्ठल कदम व संचालक भरत गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस पारितोषिक देण्यात आली. तर भाग घेतलेल्या सर्व स्पर्धाकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.