प्राणी संग्रहालयासाठी ओरोस - कुडाळचा विचार : मंत्री नितेश राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 13:53 PM
views 258  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव आणि त्यापासून शेतकरी बागायतदार यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वन्य प्राण्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लवकरच जिल्ह्यात 80 कोटी रुपये खर्चून प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी उपवनसंरक्षकांनी ओरोस आणि कुडाळ अशा दोन ठिकाणी जागा सुचवल्या आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. सावंतवाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांना चालना देण्यासाठी तसेच येथील विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात डिजिटल ग्रंथालय असा नवीन प्रयोग आपण करणार आहोत अशी माहिती मंत्री राणेंनी दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते. 


ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषता दोडामार्ग सारख्या ठिकाणी हत्तींचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे‌. शिवाय गवे व अन्य वन्य प्राण्यांचाही त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यांनी उभ्या केलेल्या बागायती शेती यांची नासधूस लक्षात घेता लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय उभरून कायमस्वरूपी यातून मुक्तता मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी तब्बल ८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. उपवनसंरक्षक यांनी ओरोस आणि कुडाळ या ठिकाणी दोन जागा सुचवल्या आहेत.याशिवाय वनतारा अशा खाजगी संस्थेमार्फत जंगली प्राण्यांवर अभ्यास करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. वन्य प्राण्यांकडून आंबा, काजू, नारळ अशा फळ झाडांचे होणारे नुकसान लक्षात घेता झाडासोबतच फळांनाही नुकसान देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री या नात्याने माझे प्रयत्न राहणार आहे. गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गमध्ये पर्यटन वाढवून कौटुंबिक पर्यटक जिल्ह्यात जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांवर आमचा भर राहणार आहे. यासाठी लवकरच हॉटेल व्यावसायिकांशी बैठक घेऊन त्यांना ताकद देण्यात येणार आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या काही अडचणी असल्यास त्याही दूर केल्या जातील, जास्तीत जास्त मोबाईल नेटवर्कचे जाळे निर्माण केले जाईल. नागपूरच्या धर्तीवर देवगड येथे लवकरच मस्य विद्यापीठ उभारण्याचा माझा मानस आहे. त्यादृष्टीने माझे पाऊल आहे. जिल्ह्यात काहीतरी नवीन करण्यासाठी माझा प्रयत्न असून सरकार या सर्व गोष्टींसाठी सकारात्मक असून निधीही देण्यासाठी सक्षम आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयातील वाचक वाढवण्याच्या दृष्टीने डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आपण राबवणार आहे. शिवाय ग्रंथालयामध्येच एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळा कक्ष निर्माण करून तशा प्रकारच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध केला जाईल. याशिवाय ग्रंथालयांना टप्पा अनुदान वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल यासाठी लवकरच ग्रंथालय चालकांची बैठक बोलावणार आहे. स्थानिक डीएड बीएड धारकांवर नोकरी सामान घेण्यासंदर्भात कोणताही अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेईल त्या दृष्टीने माझे लक्ष असेल.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील अनेक जण आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. येणाऱ्या काही दिवसात याची रांग लागलेली दिसेल. परंतु असे असले तरी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील प्रमुखांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अवैध धंद्यांना ब्रेक लावायचा आहे. त्या दृष्टीने माझे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत सकारात्मक आहेत. काही प्रकार सुरू असूनही अधिकाऱ्यांकडून त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे अशी स्पष्ट भूमिका राणेंनी मांडली.