...अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव : अनिल केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 30, 2024 17:56 PM
views 255  views

सावंतवाडी : शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाची सध्या दुरावस्था झाली आहे. गेल्यावर्षी हे मैदान एका खासगी कार्यक्रमासाठी देण्यात आले होते. त्यामुळे मैदानावर मोठ मोठे खड्डे पडले होते. शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी या वेळी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तातडीने डागडुजी करून हे मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. मात्र त्या वेळी मुख्याधिकारी यांनी मुख्य खेळपट्टीची नव्याने माती टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन क्रीडाप्रेमीना दिलं. मात्र वर्षभरात अशा प्रकारची डागडुजी करण्यात आली नाही. 

आता परत मैदानावर मातीचे मोठे ढीग रचण्यात आले असून पुढील काम थांबलेलं आहे. त्यामुळे या मैदानावर सरावासाठी येणारे खेळाडू, सामने आयोजित करणारे आयोजक यांना त्रास सहन करावा लागत आहे. क्रिडा हंगाम सुरू होऊन देखील नगरपालिका प्रशासन सुशेगात असल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत असून येत्या ८ दिवसात हे जिमखाना मैदान पुन्हा खेळण्यासाठी योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.