
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल हळदीवे (कणकवली) तर सेक्रेटरी पदी काका कुडाळकर (कुडाळ) यांची निवड करण्यात आली आहे.
कुडाळ येथील दैवज्ञ भवनच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी असोसिएशनच्या बैठकीत सन 2025 ते 2029 या चार वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे - खजिनदार बबन परब, सह सेक्रेटरी राहुल रेगे व प्रवीण काळसेकर, सह खजिनदार चंदन घाडी, उपाध्यक्ष विजय जोईल (देवगड), सुशील शेडगे (मालवण), राजू पेंढुरकर (कणकवली), संदेश कुबल (वेंगुर्ला), अभय नाईक (सावंतवाडी), शाबी तुळसकर (दोडामार्ग), नाना कुडाळकर (कुडाळ), जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून राजन गिरप (तालुकाध्यक्ष वेंगुर्ला), सत्यवान राणे (तालुकाध्यक्ष कणकवली), सुनील धुरी (तालुकाध्यक्ष कुडाळ), रिजवान शेख (तालुकाध्यक्ष मालवण), शरद शिरोडकर (तालुकाध्यक्ष सावंतवाडी), रमेश मालंडकर (तालुकाध्यक्ष देवगड), जय भोसले ( तालुकाध्यक्ष दोडामार्ग), दशरथ जाधव (कणकवली), चित्तरंजन जाधव (कणकवली), जयराम वांगणकर (वेंगुर्ला), आनंद बोवलेकर (वेंगुर्ला), संजय फर्नांडिस (वेंगुर्ला), राजू पाटणकर (कुडाळ), शंकर पराडकर (मालवण), उमेश मांजरेकर (मालवण), वासुदेव वरवडेकर (मालवण), राजा राणे (सावंतवाडी), प्रवीण काळसेकर (सावंतवाडी), प्रशांत बांदेकर (सावंतवाडी), सुधीर साटम (देवगड), उदय रूमडे (देवगड), विजय जोईल (देवगड), कृष्ण नाईक (दोडामार्ग), विजय गवस (दोडामार्ग) व निलेश तळणकर (दोडामार्ग) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यकारीणी निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, जिल्हाध्यक्ष हळदीवे म्हणाले, आमच्या या असोसिएशनमध्ये जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींचा सहभाग आहे. गतवर्षी असोसिएशनच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी भरविण्यात आलेल्या लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. याही वर्षी या स्पर्धेसह ट्वेंटी ट्वेंटी सामने, 45 वर्षावरील खेळाडूंसाठी क्रिकेट स्पर्धा, यासोबतच आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. समाजाचे आपण देण लागतो, त्यामुळे जे जे समाजासाठी देता येईल ते देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. क्रिकेट खेळासह समाजपयोगी कार्य करणे हाच आमच्या असोसिएशनचा उद्देश आहे. क्रिकेट खेळासोबतच सामाजिक कार्यात सिंधुदुर्गचा राज्यभर नावलौकिक केला जाणार असल्याचे श्री.हळदीवे यांनी सांगितले.
सेक्रेटरी श्री.कुडाळकर म्हणाले, चार वर्षांपूर्वी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या असोसिएशनची स्थापना केली. गेल्या चार वर्षांत प्रत्येक तालुक्यात क्रिकेट स्पर्धांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. आज पुढील चार वर्षांसाठी नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे. या संघटनेत जिल्ह्यातील 200 खेळाडू सदस्य आहेत. त्या व्यतिरिक्त बरेच खेळाडूंचे सहकार्य मिळत असते. या सर्व खेळाडूंमधून वैभववाडी तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यात असोसिएशनची तालुका कार्यकारीणी कार्यरत आहेत. या प्रत्येक तालुक्यातून पाच सदस्य जिल्हा कार्यकारीणीसाठी पाठविण्यात आले होते. अशा एकूण 35 सदस्यांमधून पुढील चार वर्षांसाठी हि जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून आगामी काळात अधिक चांगले उपक्रम, क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. सदस्य संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 16 वर्षांखालील व 16 वर्षावरील खेळाडूंसाठी लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येणार असल्याचे श्री.कुडाळकर यांनी यावेळी सांगितले.