दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर !

संतापलेल्या ग्रामस्थांचा रुग्णालय बंदचा इशारा
Edited by: संदीप देसाई
Published on: November 18, 2023 19:41 PM
views 381  views

दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याठिकाणी २४  तास कार्यरत असलेला एकच डॉक्टर सर्वांनाच २४ तास रुग्णसेवा देण्यात तोकडा पडत असल्याने या रुग्णालयात सेवा घेणाऱ्या झरेबांबर येथील एका ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याने त्या वृद्धेचे नातेवाईक व झरेबांबर ग्रामस्थांनी या रुग्णालयातून सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचेवर हलगर्जी पणाचा आरोप केला आहे. मात्र हा आरोप येथे कार्यरत असलेल्या डॉ. अक्षय रेड्डी यांनी फेटाळला असून प्रकृती स्थिर असणाऱ्या रुग्णाला फीट आल्याने ती घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.  तर एकच डॉक्टर २४ तासात किती तास काम करेल असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा नेमक काय करतेय हा खरा सवाल निर्माण झाला आहे.  या घटनेची गंभीर दखल बाळा नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेत डॉक्टर नसतील तर थेट रुग्णालय बंद चा इशारा दिला आहे.

दरम्यान मृत्यू प्रमाणपत्र न देण्याच्या  कारणावरून रुग्णालयातील डॉ. अक्षय रेड्डी यांना येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी धारेवर धरले. शिवाय या संपूर्ण प्रकाराची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनाही तातडीने देण्यात आली. 

       झरेबांबर काजुळवाडी येथील चंद्रावती चंद्रकांत नाईक या वृद्ध महिलेची प्रकृती खालावल्याने मुलांनी तिला काल शुक्रवारी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर उपचार देखील सुरू केले. मात्र वृद्धेची प्रकृती अधिकच खालावल्याने तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याची विनंती नर्सेस जवळ केली. परंतु डॉक्टर आलेच नाहीत. त्यानंतर तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच शनिवारी सकाळी ९ वा. सुमारास डॉ. अक्षय रेड्डी आलेत. त्यांनी चंद्रावतीची तपासणी केली असता तिला अधिक उपचारासाठी नजीकच्या गोवा राज्यातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांना दिला. वृद्ध महिलेला रुग्णवाहिकेमधून गोव्यातील म्हापसा येथील आजिलो रुग्णालयात नेले. परंतु तिथे गेल्यावर त्यांचा अगोदरच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

२१ नोव्हेंबरपासून दोडामार्ग रुग्णालय बंद

       दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात घडलेला प्रकार अनींदनीय आहे. नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. अलीकडील काळात या रुग्णालयाच्या कारभाराल संपूर्ण तालुक्यातील जनता अक्षरशः कंटाळली असून रुग्णालयाकडून जर आरोग्य सुविधा मिळतच नसतील तर हे रुग्णालय हवे तरी कशाला? असा सवाल उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच चंद्रावती यांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोपही नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे. येत्या सोमवार पासून दोडामार्गचे हे रुग्णालय जनतेच्या वातीनेचच बंद करण्यात येत असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्स यांना निवेदन पाठविण्यात आले असून दोडामार्ग मध्ये रुग्णालय वरून वातावरण चांगलेच तापले आहे. या निवेदनावर लक्ष्मण नाईक, चेतन चव्हाण, प्रवीण गवस, रंगनाथ गवस, बाबुराव धुरी, देवेंद्र शेटकर, पराशर सावंत, संगीता देसाई व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चंद्रावतीची तब्बेत उत्तम होती - डॉ. अक्षय रेड्डी 

दरम्यान याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चंद्रावती यांना पित्ताशयात त्रास झाल्याने त्यांना आम्ही सलाईन तसेच आवश्यक इंजेक्शन देण्यात आली होती. तसेच त्या नॉर्मल पेशंट होत्या, त्यांचा बीपी वैगरे व्यवस्थित होता. त्यामुळे रुग्णालयातील नर्सेसचे विशेष लक्ष देखील चंद्रावतीवर होते आणि आवश्यक उपचार ही देण्यात आले होते. त्यांची तब्बेत तशी व्यवस्थित असल्याने आपण रात्री व्हीजिट केली नाही. आणि सध्या आपण एकच डॉक्टर इथे कार्यरत असून 24 तास रुग्णसेवा देत आहे. त्यामुळे रेग्युलेर सर्वच केस साठी आपण सेवा देणे शक्य नाही. मात्र क्रिटिकल केस असल्यास आम्ही हायगय करत नाही. त्यात चंद्रवती यांची तब्बेत चिंताजनक नव्हती, उलट त्यांची तब्बेत स्थिर असल्याने कुटुंबीय त्यांना सकाळी घरी नेण्याच्याही तयारीत होते. मात्र आज सकाळी त्यांना अचानक फीट आल्यामुळे आम्ही तिला गोव्यात हलविण्याच्या सूचना तिच्या नातेवाईकांना दिल्या होत्या.