दोडामार्ग तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये संताप

ओमकार हत्तीसाठी वन कर्मचाऱ्यांना दोडामार्गमधून गोवा सीमेवर बोलावले
Edited by: संदीप देसाई
Published on: September 17, 2025 21:55 PM
views 83  views

दोडामार्ग : ओंकार हत्ती गोवा हद्दीवर गेला असला तरी दोडामार्ग तालुक्यात घोटगे गांवात ५ वन्य हत्तींचा वावर व उपद्रव सुरू आहे.  मात्र यां ५ हत्तीचे अस्तित्व विसरून वनाधिकारी दोडामार्ग येथील वन विभागाचे स्थानिक कर्मचारी व हत्ती गस्ती पथक यांना गोव्याच्या सीमेवर बोलावून घेतल्याने दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांचा आरोप आहे की, दोडामार्गात आधीच ५ हत्तींचा वावर सुरू असताना येथे गस्ती पथकांची उपस्थिती अत्यावश्यक आहे. तरीही, गोवा हद्द आणि सावंतवाडी जवळ गेलेल्या ‘ओंकार ’ हत्तीच्या बंदोबस्तासाठी येथीलच गस्ती पथकांना गोवा सीमेकडे पाचारण करण्यात आले आहे. यामुळे ५ हत्तीच्या उपद्रवातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती, पिकांचे संरक्षण करण्यास मोठी अडचण येत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावंतवाडी तालुक्यात स्वतंत्र वनविभाग तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कार्यरत आहे. उलट जिल्हा उपवन संरक्षक, सहाय्यक उपवन संरक्षक यांच्या के बडे अधिकारी त्याठिकाणी कार्यरत असतानाही दोडामार्ग येथील कर्मचाऱ्यांवर ओंकार हत्ती ची जबाबदारी टाकण्यात येत असल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सावंतवाडीतील हत्तीबंदोबस्तासाठी तेथील स्थानिक टीम तैनात करण्याची स्वतंत्र मागणी दोडामार्गातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून होत आहे. विशेषतः कोणावर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावात तिलारी खोऱ्यात त्या पाच हत्तींचा उपद्रव कायम असल्याने येथील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचारी व हत्तीगस्ती पथकांना येथून हलवणं वन खात्यासाठी आत्मघातकीपणाचे सुद्धा करू शकतो त्यामुळे ओंकारच्या बंदोबस्तासाठी सावंतवाडी सीमेवर सावंतवाडीतील वनाधिकारी व स्थानिक माहीतगार ग्रामस्थांचे मदत घेऊन स्वतंत्र गस्तिपथक तैनात करणे उचित ठरेल. 

स्थानिक शेतकऱ्यांचे आता ओंकार हत्तीच्या बंदोबस्त करण्यासाठी येथीलच टीम हलवील्याने तीव्र नाराजी आहे, “आमच्या पिकांचे आधीच हत्तींच्या उपद्रवामूमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गस्ती पथकांना बाहेर पाठवल्याने आमच्यावर आणखी संकट आले आहे.” वन विभागाने तात्काळ स्थानिक पथकांची पुनर्नियुक्ती करून दोडामार्गात गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.