
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावामध्ये महाराष्ट्र शासन कृषि विभाग, पानी फाऊंडेशन व कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा लागवड व्यवस्थापन डिजिटल शेतीशाळा तसेच भात बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या दोन्ही उपक्रमांना आंदुर्ले मधील कृषी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आंदुर्ले ग्रामपंचायत येथे रात्री ७.३०–९.३० या वेळेत पानी फाऊंडेशनच्या डिजिटल आंबा शेतीशाळेच्या पहिल्या वर्गामध्ये कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आंबा पीक लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच बदलत्या हवामानानुसार आंब्याच्या बागेची काळजी कशा प्रकारे घ्यावी आणि उत्पादनात वाढ कशी करावी, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी गावातूनच या डिजिटल शेतीशाळेचा लाभ घेतला.
यासोबतच, कृषि विभागातर्फे आयोजित भात बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आणि बियाणे उगवण क्षमता चाचणी कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी, कुडाळ विजय घोंगे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून गावातील सर्व शेतकऱ्यांना भात बीजप्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी करण्याचे आवाहन केले. कृषिसेवक सोमकांत आईर यांनी भाताच्या बियाण्यांवर विविध रासायनिक आणि जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उगवण क्षमतेचे बियाणे निवडण्यास मदत होईल आणि दुबार पेरणी टाळता येईल, असे तालुका कृषि अधिकारी, कुडाळ भास्कर चौगले यांनी सांगितले. तद्नंतर तालुका कृषि अधिकारी, कुडाळ भास्कर चौगले यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच आरती पाटील, सोसायटी चेअरमन दिगंबर मयेकर, माजी चेअरमन महेश राऊळ, सदानंद सर्वेकर, सतिश राऊळ, अनिल भगत, प्रसाद सर्वेकर, अंजनी पाटकर, स्मिता पिंगुळकर, अनुराधा साळगांवकर, सुप्रिया येरम, सोसायटी संचालक प्रसाद गावडे, माजी उपसरपंच मंगेश सर्वेकर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला सुमारे ६० शेतकरी उपस्थित होते.
आंबा व भात पिकांविषयक माहिती मिळवण्यासाठी आणि नवनवीन पद्धती शिकण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह दिसून आला. या दोन्ही उपक्रमांमुळे शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकंदरीत, कृषि विभाग आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा डिजिटल आंबा शेतीशाळा व भात बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वी ठरला आणि शेतकऱ्यांसाठी एक माहितीपूर्ण तसेच प्रेरणादायी अनुभव ठरला. या कार्यक्रमामध्ये आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या स्तुत्य प्रयत्नांचे कौतुक केले व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आभार मानले आणि भविष्यकाळातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.