अँड. शिवाजी देसाई यांना ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनचा डायनॅमिक पर्सनॅलिटी ऑफ द इअर पुरस्कार

चौफेर कार्याचा झाला सन्मान !
Edited by:
Published on: November 27, 2022 18:51 PM
views 225  views

दोडामार्ग : सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अष्टपैलू योगदानाबद्दल सत्तरी तालुक्यातील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ऍड शिवाजी देसाई यांना पुण्यातील ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनच्या वतीने भूषण पुरस्कार या सदरात देण्यात येणारा डायनॅमिक पर्सनॅलिटी  ऑफ द इअर हा पुरस्कार पुण्यातील अण्णा भाऊ साठे सभागृहात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते २६ नोव्हेंबर रोजी प्रदान करण्यात आला. अँड देसाई हे आपल्या वकीली पेशा बरोबर सामाजिक क्षेत्रात असंख्य माध्यमातून सक्रिय आहेत . त्यांना सन २०१९ साली गोवा सरकारचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. गरुड  झेप अकादमी पुणेच्या वतीने देखील उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड २०१७ देखील बहाल करण्यात आला होता.


कोविड काळात अँड देसाई यांनी सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रचंड जनजागृती केली.आणि सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या समाज माध्यमातील व्हिडिओची सरकारने देखील कोविड काळात दखल घेतली. कोविड  काळात त्यांनी समाज माध्यमातून काजू शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळावी म्हणून यशस्वी आंदोलन चालविले आणि सरकारला आधारभूत किंमत काजूला देण्यास भाग पाडले  सत्तरीत हल्लीच झालेल्या पुराच्या वेळी गोव्यातील अनेक सामाजिक संस्थांना एकत्र करून पुर भागात मोठी मदत रात्रंदिवस पोचाविली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल काणकोण आमोण येथे झालेल्या लोकोत्सवात देखील घेण्यात येऊन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.


सत्तरीत झालेल्या मेलाऊली आय आयटी आंदोलनावेळी त्यांनी निर्णायक भूमिका घेतली. या विषयी त्यांनी काढलेला व्हिडिओ प्रचंड गाजला. देसाईंनी अगदी त्यांच्या महाविद्यालयीन कारकिर्दी पासून संपूर्ण गोव्यात असंख्य विषयावर व्याख्याने दिली आहेत.आजपर्यंत त्यांची हजाराच्या वर व्याख्याने झाली आहेत.त्यांची विशेषतः म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही विषयावर बोलण्याची हातोटी आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांची व्यक्तिमत्व विकास ह्या विषयावरील, तसेच अन्य विषयावरील व्याख्याने सातत्याने होत असतात. जवळपास सत्तर पेक्षा जास्त  विषयांवर बोलण्याची त्यांची हातोटी आहे. व्याख्याने देणे ही त्यांची आवड असून त्यांनीं त्याला समाज सेवेचे माध्यम बनविले आहे. ते शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास, सावरकर,अशा असंख्य विषयावर ते व्याख्याने देतात. गेल्या आठ वर्षांपासून ठाणे सत्तरी सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांची विविध इतिहास कालीन विषयावर प्रत्येक गणेश चतुर्थीला व्याख्याने होत असतात. सत्तरी तालुक्यातील सामाजिक आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सामाजिक कार्याची आवड त्यांना बालपणापासून आहे. त्यांनी पहिले भाषण इयत्ता दुसरीत आणि पहिले सामाजिक आंदोलन इयत्ता आठवीत असताना केले. धावे खाण विरोधी आंदोलनात अँड शिवाजी देसाईंनी विशेष भूमिका बजावली. माहिती अधिकाराचा वापर करून ही होऊ घातलेली बकायदेशीर खाण रद्द करण्यास मदत केली. त्यामुळे नगरगाव पंचायत भागातील असंख्य जलस्त्रोत वाचले.


सत्तरी तालुक्यातील अनेक बेकायदेशीर खाणी ज्या म्हादई नदीच्या तीरावर होणार होत्या त्या बंद करण्यासाठी झालेल्या लोक आंदोलनात अँड देसाई सर्वात पुढे होते. पण त्याचबरोबर पर्यावरण राखून कायदेशीर खाणी सुरू व्हाव्यात यासाठी देखील ते आग्रही आहेत.तत्कालीन काळात सत्तरी तालुक्यातील बेकायदेशीर खाण विरोधी आंदोलनात माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  व सत्तरीतील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे, पत्रकारांचे प्रचंड सहकार्य लाभले.अनेक लोक ह्या लढ्यात सहभागी झाले. नगरगाव नागरिक समितीच्या माध्यमातून अँड देसाईंनी नगरगाव भागात अनेक तरुणांना सोबत घेऊन  काही वर्षांपूर्वी नगरगाव भागातील नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्यासाठी आंदोलन केले आणि त्यासाठी खड्डे मोजा स्पर्धा घेतली जी गोव्यात गाजली आणि त्यामुळे नगरगाव पंचायत भागातील अनेक रस्ते दुरुस्त झाले.वन निवासी कायद्याची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून अँड देसाईंनी सत्तरीच्या गावागावात जनजागृती केली. नगरगाव पंचायतीच्या ग्रामसभेत अनेक वेळा त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अनेक महत्वाचे ठराव संमत करून घेतले. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेकडून व्हावी म्हणून ठराव घेतला व त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून सरकारकडे मागणी केली. कायदा महाविद्यालयात शिकत असताना अँड देसाई यांनी कायदा जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम केले. तसेच त्या वेळी त्यांनी म्हादई बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन म्हादई आमची आई हे पथ नाट्य लिहिले व विद्यार्थ्यांना घेऊन गोव्याच्या अनेक भागात सादर केले जे विशेष गाजले.हल्लीच त्यांनी विशेष मुलांसाठी संघर्ष हे पथनाट्य लिहून ते सत्तरी तालुक्यातील अनेक वकिलांना सोबत घेऊन वाळपईत सादर केले. गोव्याच्या इतिहासात वकिलांनी एकत्र येऊन पथनाट्य सादर करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा.अँड देसाई यांच्या प्रयत्नामुळे वाळपई तील मार्केट संकुलाचे अर्धवट उरलेले काम पूर्ण होऊन त्याचा ताबा व्यापाऱ्यांना मिळाला. तसेच वाळपई बस स्थानकाचा सभागृह लोकांना वापरण्यास मिळाला आणि यासाठी त्यांना स्व.माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सहकार्य लाभले.


अँड देसाई अनेक विषयांवर वर्तमापत्राद्वारे सातत्याने लेखन करत असतात.ते एक कवी देखील आहेत.अनेक कायदा जनजागृती कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या माध्यमातून सत्तरीत नाणूस किल्ला चळवळ त्यांनी अनेकजणांना सोबत घेऊन सुरू केली आहे.ह्या अंतर्गत प्रत्येक २६ जानेवारीला नाणूस किल्ल्यावर क्रांती दिन २६ जानेवारी १८५२ रोजी क्रांतिवीर दीपाजी राणेंनी पोर्तुगिजां विरोधात केलेल्या पहिल्या सशस्त्र क्रांतीला उजाळा देण्यासाठी साजरा करण्यात येतो.माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून अँड देसाईंनी सत्तरीत प्रचंड जनजागृती करून अनेक लोक उपयोगी प्रकरणे उजेडात आणली. सत्तरीतील अंगणवाड्यां प्रश्न, प्राथमिक शाळांचा प्रश्न तसेच २००८ साली झालेल्या पुरामुळे नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न उजेडात आणले. मराठी भाषेच्या आंदोलनात देखील ते सक्रिय आहेत.गोव्यातील तिसरे ग्रामीण माहिती अधिकार संमेलन धारखंड सत्तरीत घेतले.आपल्या ब्रम्हा करमळी गावात त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मराठी संस्कार केंद्र ब्रम्हा करमळीच्या माध्यमातून व संदीप केळकर यांच्या सहकार्याने राबविले.गावात त्याचा प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम तब्बल विष वर्षे चालला.२००८ साली वाळपई त झालेल्या मराठी युवा साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. गोवा माहिती अधिकार फोरमचे देखील ते सदस्य आहेत. त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी प्रकरणे उजेडात आणली. वर्तमान पत्रात सातत्याने अनेक विषयांवर त्यांचे लेखन असते.