पालकमंत्र्यांचा 10 वर्षांपूर्वीचा नवीन कुर्ली विकासाचा शब्द हवेतच विरला

अनंत पिळणकरांची टीका
Edited by: समीर सावंत
Published on: September 18, 2025 13:33 PM
views 50  views

फोंडाघाट : पालकमंत्री नितेश राणे यांनी नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकिवर डोळा ठेवून नागरी सुविधा विकास आढावा बैठकीचा निव्वळ फार्स केला आहे. पालकमंत्री नितेश राणे हे आमदार असताना त्यांनी 10 वर्षांपूर्वी मलासुद्धा नवीन कुर्ली वसाहत मधील 13 नागरी सुविधा पूर्ण करण्याचा शब्द दिला होता.मात्र तो पाळला नाही.आणि आता नव्याने निर्माण झालेल्या नवीन कुर्ली ग्रामपंचायत च्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या आढाव्याचा फार्स करत आहेत अशी टीका नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून केली आहे. मनोज रावराणे यांनी नवीन कुर्ली ग्रामपंचायत चे नामकरण नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत करण्याच्या केलेल्या  सूचनेला गावातील नागरिकांचा आक्षेप आहे. तसे झाल्यास स्थानिक नागरिकांचे जनआंदोलन उभारू असा इशाराही पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की  ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून

नवीन कुर्ली गावात पालकमंत्र्यांनी विकासकामांची आढावा बैठक घेतली. नवीन कुर्ली गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे म्हणणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांनी मागील 10 वर्षांपूर्वी विकासकामांचा दिलेला शब्द का पाळला नाही ?. काल झालेली आढावा बैठक फक्त भाजपा कार्यकर्त्यांपुरती मर्यादित होती काय ?  दुपारी 2 वाजता नियोजित असलेली आढावा बैठक सायंकाळी 7 वाजता घ्यावी लागली. या आढावा बैठकीत मनोज रावराणे यांनी

नवीन कुर्ली ग्रामपंचायत चे नामकरण नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत करावे अशी सूचना मांडल्याचे समजते. वसाहत या शब्दाला नवीन कुर्ली मधील ग्रामस्थांचा विरोध आहे.  नूतन ग्रामपंचायत चे नाव नवीन कुर्ली ग्रामपंचायत ऐवजी नवीन कुर्ली वसाहत ग्रामपंचायत असे झाल्यास स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने याविरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल. मागील 35 वर्षें नवीन कुर्ली ग्रामपंचायत होऊ नये यासाठी मनोज रावराणे यांचे वडील तुळशीदास रावराणे आणि त्यांनतर मनोज रावराणे ह्यांनीच खोडा घातला होता.  प्रशासकीय पातळीवर नवीन कुर्ली ग्रामपंचायत होऊ नये यासाठी लेखी पत्रव्यवहार रावराणे यांनी केला होता. त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. गरज पडल्यास ते जाहीर करू. मनोज रावराणे हे नवीन कुर्ली वसाहत मध्ये मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर डोळा ठेवून आहेत. आयत्या बिळात नागोबा बनू पाहणाऱ्या मनोज रावराणे यांनी स्वतःच्या लोरे गावात लक्ष घालावे. आमच्या गावात लुडबुड करू नये अन्यथा आम्हालाही लोरे गावात लक्ष घालावे लागेल असा इशाराही पिळणकर यांनी इशारा दिला आहे.