
मालवण : तालुक्यातील आनंदव्हाळ कातवड नांदरूख व साळकुंभा कातवड नांदरुख या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या रस्त्याची गेल्या चार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे धोकादायक बनले असून संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने या संदर्भात संबंधित विभागाचे लक्ष वेधत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी आयोजित बैठकीत दिला.
दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात नांदरुख येथील गिरोबा मंदिरात काल नांदरूख, कातवड, आनंदव्हाळ, आंबडोस येथील ग्रामस्थांनी नांदरूख सरपंच रामचंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी माजी सरपंच विलास मांजरेकर, कातवड माजी सरपंच उदय नाईक, माजी सरपंच भगवान मांजरेकर, कातवड उपसरपंच गणेश चव्हाण, गोविंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण, अरुण चव्हाण, महादेव चव्हाण, रमेश चव्हाण, सुरेश परब, सिद्धेश साळकर, सुजय घाडी, गणपत पोखरणकर, प्रवीण परब, वैभव नाईक, राजाराम हळदणकर, तेजस चव्हाण, राजेंद्र चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण, सुधाकर नामनाईक, किरण चव्हाण, सुनील चव्हाण, भरत चव्हाण, अमित माधव, रमेश वस्त, महेश मेस्त्री, प्रभाकर सावंत, हेमंत मेस्त्री तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत आनंदव्हाळ कातवड नांदरुख व साळकुंभा कातवड नांदरुख या रस्त्याची गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. परिणामी हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून या ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्याची संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे याबाबत संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले. याची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.