म्हापणच्या उपसरपंच निवडीत किंगमेकर ठरले आनंद गावडे

माजी सरपंच अभय ठाकूर यांचे लाभले मोलाचे सहकार्य
Edited by: संदीप चव्हाण
Published on: December 27, 2022 17:38 PM
views 215  views

म्हापण : दैनिक कोकणसादने प्रसिद्ध केलेली बातमी तंतोतंत खरी ठरत म्हापण ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरलेले आनंद गावडे यांनी आपली चाणक्यनीती यशस्वीपणे पार पाडत म्हापण ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांना विराजमान केले.

सर्वात प्रथम जय हनुमान गाव विकास पॅनल मळई हे स्वतंत्र पॅनल काढत समोर दोन पॅनलची तगडे आव्हान असताना देखील प्रभाग २  मधून आपले तीनही उमेदवार बहुमताने निवडून आणले.  त्यामुळे खऱ्या अर्थाने उपसरपंच निवडीला रंगत आली. परंतु आनंद गावडे यांनी आपली रणनीती आखत आपलाच उमेदवार उपसरपंचपदी बसावा यासाठी निवडून आलेले श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांची जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.

या प्रवेशावेळी चंद्रकांत उर्फ भाई घाडी, बाळा राऊळ खवणे, शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील जाहीररीत्या भाजप मध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी भाजप ज्येष्ठ पदाधिकारी वसंत तांडेल, तालुका पदाधिकारी बाबली वायंगणकर, ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य, गुरुप्रसाद चव्हाण, सौ.सिया मार्गी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपसरपंच निवडणुकी वेळी उपसरपंच पदाकरीता श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर व अविनाश खोत यांचे परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु माजी सरपंच अभय ठाकूर व किंगमेकर ठरलेले आनंद गावडे यांनी यशस्वी खेळी करत अविनाश खोत यांनी दाखल केलेलला अर्ज मागे घेत श्रीकृष्ण उर्फ सुरेश ठाकूर यांची उपसरपंचपदी बिनविरोध वर्णी लावली. उपसरपंच बिनविरोध करण्यास आनंद गावडे यांना माजी सरपंच अभय ठाकूर यांचीही फार मोलाची साथ लाभली.