प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप महिलेचा बळी : रवी जाधव

Edited by: विनायक गांवस
Published on: September 24, 2025 16:38 PM
views 759  views

सावंतवाडी : रस्त्यांवरील खड्डे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका सरकारी कर्मचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा निषेध करत, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जर येत्या रविवारपर्यंत सावंतवाडी शहरातील, बसस्थानकाजवळील आणि महामार्गावरील जीवाला धोका निर्माण करणारे खड्डे बुजवले नाहीत, तर येत्या मंगळवारी खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

जाधव यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार आपली जबाबदारी झटकत असल्यानेच असे अपघात घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सातत्याने प्रशासनाला मदत करत आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे, रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करणे, आणि अपघातग्रस्तांना मदत करणे यांसारखी कामे प्रतिष्ठान स्वखर्चाने करत आहे. मात्र, प्रशासनाने या मदतीचा गैरफायदा घेत आपली जबाबदारी टाळली आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे. पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना या गंभीर प्रकरणात लक्ष घालून संबंधित प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खड्डे न बुजविण्यात आल्यास होणाऱ्या आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा झाल्यास किंवा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केले.