
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. सुमेधा नाईक-धुरी म्हणाल्या, शासनाच्या अनेक उपक्रमांतील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. वाचन ही काळाची गरज आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली आहे असा अनुभव असताना आज मुलं वाचण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतं. शासनाच्या या उपक्रमामुळे मुलांना आणखीन प्रेरणा मिळेल. वाचन कट्ट्याचा अनुभव देखील चांगला आहे. पुस्तक वाचल्यावर मुलं समृद्ध होणार असून वाचन हा एक संस्कार आहे. यासाठी कोकणसादला देखील विशेष धन्यवाद द्यावे लागतील. आज मुलांमध्ये वाचनाची लाट आलेली आहे. वाचलं पाहिजे हे त्यांना कळल आहे. काय वाचावं ? याच मार्गदर्शन मुलांना होण आवश्यक असून शासनाच्या या उपक्रमातून मुलं वाचनाकडे वळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुमेधा नाईक, प्रा. वनवे, प्रा. कळंगुटकर, प्रा. शितोळे, पर्यवेक्षक श्री. पाटील आदी उपस्थित होते.